आपला देश हा उत्सवप्रिय देश आहे. वर्षभरात अनेक सण-उत्सव आपल्याकडे साजरे केले जातात. पण नव्या वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रात हा सण उत्सवात साजरा केला जातो. परंतु, अनेकांना मकर संक्रात नेमकी का साजरी केली जाते? याबद्दल माहिती नसते.
आजच्या दिवशी सूर्य मकर राशीतून दुसऱ्या राशीमध्ये दरवर्षी याच दिवशी प्रवेश करत असतो. त्या प्रक्रियेला ‘मकर संक्रांत’, असं म्हटलं जातं. दुसऱ्या राशीत प्रवेश करणं म्हणजे संक्रमण. त्यामुळे या सणाला ‘मकर संक्रांत’ असं म्हटलं जातं.
मकर संक्रांत हा असा एकमेव सण आहे जो प्रत्येक वर्षी एकाच तारखेला येतो. हा सण ‘पतंगांचा सण’ म्हणून ओळखला जातो. परंतु, हा सण साजरा करण्यामागे शास्त्रीय कारण खूपच कमी लोकांना माहीत आहे. सकाळी उठून पतंग उडवल्याने शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. तसेच शरीराला ‘व्हिटामिन डी’ही मिळते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवायची प्रथा पडली.
यासोबत आजच्या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व असते. या दिवसात प्रचंड प्रमाणात थंडी असते. तिळाचे सेवन केल्याने शरीर उष्ण राहते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ खाण्याची पद्धत सुरु झाली. तसेच तिळापासून विविध पदार्थ बनवण्यास सुरुवात झाली.
मकर संक्रांतीच्या दिवशी महिला मंदिरात जाऊन एकमेकींना हळदी-कुंकू आणि वाण देतात. महिला मंडळ मकरसंक्रांतपासून रथसप्तमी पर्यंत हळदी-कुंकू समारंभ आयोजित करतात. हळदी-कुंकूच्या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुवासिनींना घरी वाण देण्या-घेण्यासाठी बोलावता येतं.
थोडक्यात महिलांसाठी संक्रांत हा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यासही विशेष महत्त्व असतं. त्यामागेही शास्त्रीय कारण असतं. अनेकदा सणासुदीला काळा रंग वर्ज्य करण्यात येतो. मात्र, मकर संक्रात हिवाळ्यामध्ये येते. काळा रंग उष्णता शोषून घेतो. त्यामुळे या दिवशी काळा रंगाचे कपडे परिधान केले जातात. तसेच या दिवशी हलव्याचे दागिनेही घालण्याची प्रथा आहे.