Download App

हेविवेट नेत्यांचा प्रचार, सोबतीला प्रफुल्ल पटेल… तरीही भाजपला भंडारा-गोंदिया जड का वाटू लागलयं?

2014 ची विधानसभा निवडणूक. शिवसेनेनं त्यावर्षी 63 आमदार निवडून आणले होते. पण सेनेनं सगळ्यात खराब कामगिरी कुठं केली असेल तर ती विदर्भात. रामटेक वगळता बहुतांश मतदारसंघात शिवसेनेच्या (Shivsena) सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. यातच एक होता साकोली मतदारसंघ. तिथं शिवसेना उमेदवाराला अवघी दीड हजार मत मिळाली होती. त्यामुळे त्यांचंही डिपॉझिट जप्त झालं होतं. बरोबर दहा वर्षांनंतर त्याच उमेदवाराला काँग्रेसनं (Congress) भंडारा-गोंदिया मतदारसंघातून थेट लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे भाजपचे (BJP) हेविवेट उमेदवार असलेल्या सुनील मेंढे यांच्यापुढे डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवाराचा कसा निभाव लागणार? भंडारा-गोंदियामध्ये काय परिस्थिती आहे? तेच आपण या पाहू… (BJP has nominated Sunil Mendhe and Congress has nominated Prashant Padole from Bhandara-Gondia Lok Sabha Constituency.)

खरंतर काँग्रेसचे कार्यकर्ते भंडारा-गोंदियामधून यंदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करत होते. नानांचं या मागणीबाबात सुरुवातीपासून तळ्यात-मळ्यात होते. त्यांनी उमेदवारी अर्ज घेतले. पण होय-नाही, होय-नाहीच सुरु होतं. शेवटी त्यांचं नाहीच असं ठरलं. “मला राज्यभरात प्रचार करायचा आहे, तुम्ही मला एकाच मतदारसंघात गुंतवून ठेवू नका. पण मी तुम्हालाही नाराज करणार नाही. मी माझ्याच विश्वासातील आणि खात्रीतील उमेदवार देतो”, असा संदेश नानांनी दिला. यानंतर नाना पटोले कोणाला उमेदवारी देणार याकडे भाजपसहित सगळ्यांचच लक्ष लागून होतं. अशावेळी नानांनी मैदानात उतरवलं प्रशांत यादवराव पडोळेंना. हे तेच पडोळे होते ज्यांचा उल्लेख आपण सुरुवातीला डिपॉझिट जप्त झालेला उमेदवार म्हणून केला.

भाजपच्या अशोक नेतेंची हॅटट्रिक रोखण्यासाठी काँग्रेसनं केली तयारी… वडेट्टीवारांनी उचललं शिवधनुष्य…

सहकारमहर्षी यादवराव पडोळे यांचे पुत्र या व्यतिरीक्त प्रशांत पडोळे यांची फारशी ओळख नव्हती. नानांच्या या निर्णयांचं अनेकांना आश्चर्य वाटलं. अगदी भाजपला सुद्धा. सुरुवातील भाजप इथला उमेदवार बदलणार अशी चर्चा होती. पण काँग्रेसचा उमेदवार पाहून भाजपने सुनील मेढेंचीच उमेदवारी कायम ठेवली. मतदारसंघातील साकोलीचे नाना पटोले हे एकमेव आमदार सोडले तर अन्य आमदार महायुतीचेच आहेत. तुमसरचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे, भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर, अर्जुनी मोरगावचे राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे, तिरोराचे भाजपचे आमदार विजय राहंगडले, गोंदियाचे विनोद अग्रवाल असे आमदार महायुतीच्या बाजूने आहेत.

महायुतीच्या बाजूने असलेला सगळ्यात मोठा प्लस पॉईंट म्हणजे प्रफुल्ल पटेल. भंडारा-गोंदियाचा मतदारसंघ म्हणजे पटेलांचे घरच.ते इथून चारवेळा खासदार झाले. केंद्रीय मंत्रीही झाले. 2018 मध्ये नाना पटोले यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर मधुकर कुकडे यांना निवडूनही आणले होते. आता हेच पटेल अजितदादांसोबत पर्यायाने महायुतीसोबत आहेत. भाजपसाठी ही जमेची बाजू आहे. भाजपची प्रचार यंत्रणाही मजबूत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा भाजपने यशस्वी केली आहे.

भाजपसाठी ही कागदावरची परिस्थिती जमेची बाजू असली तरीही जसजसे दिवस जातील तसतशी भाजपला सोपी वाटणारी निवडणूक अवघड झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे विजयाचे गणित आखताना भाजपला बरीच मेहनत घ्यावी लागत आहे. मागच्या 15 वर्षांमध्ये मतदारसंघात न आलेला एकही मोठा उद्योग आणि त्यातून निर्माण झालेला बेरोजगारीचा मुद्दा हा सर्वात चर्चा विषय. याशिवाय रखडलेला ‘भेल’ प्रकल्प हा प्रचारातील कळीचा मुद्दा आहे. धानाचे विक्रमी उत्पादन होऊनही एकही प्रक्रिया उद्योग नाही. भंडारा जिल्ह्यातील एमआयडीसी ओस आहे.नवे प्रकल्प आणण्यात भाजपचे खासदार यशस्वी ठरलेले नाहीत. सिंचन आणि पर्यटनाला वाव असला तरी त्या दृष्टीने प्रयत्न नाहीत. पारंपरिक उद्योगांच्या पुनरुज्जीवनासाठी कसलेही प्रयत्न झाले नसल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. महामार्गाशी जुळलेला मतदारसंघ असूनही विकास मात्र पोहोचला दिसून येत नाही. हेच मुद्दे भाजपला निटेगिव्ह जाण्याची शक्यता आहे.

लीड देणाऱ्या तालुक्याला 5 कोटींचा निधी देणार; धनंजय महाडिकांचे मतदारांना प्रलोभन

तशी निवडणूक काँग्रेससाठीही सोपी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचे वलय भेदण्याचं मोठं आव्हान काँग्रेसपुढे असणार आहे. भाजपच्या तगड्याआणि नियोजनपूर्वक प्रचार यंत्रणेपुढे आणि हेवीवेट नेत्यांच्या प्रचार सभांपुढे या नव्या चेहऱ्याचा निभाव लावताना नाना पटोले यांचाही कस लागणार आहे. प्रशांत पडोळे यांनाही जनसंपर्क वाढवून आपल्या कोऱ्या कॅनव्हॉसमध्ये रंग भरावे लागणार आहेत. काँग्रेसची प्रचार यंत्रणा सध्या नाना पटोले यांच्याभोवतीच फिरत आहे. पण त्यांच्याही मर्यादा आहेत. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, मुकुल वासनिक आणि शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांची वगळता कुण्याही बड्या नेत्याची सभा झालेली नाही. थोडक्यात घटक पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव दिसत आहे. याशिवाय या मतदारसंघात बहुजन समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचीही परंपरागत मते आहेत. या दोघांची बेरीज गेल्या निवडणुकीत एक लाखाच्या जवळपास होती. या मतांचा कोणाला फटका बसणार हेही पाहव लागणार आहे.

follow us

वेब स्टोरीज