Download App

सोलापूरात काँग्रेसचे फटाके… शिंदेंना कॉन्फिडन्स की ओव्हर कॉन्फिडन्स?

काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना विजयाचा नेमका कॉन्फिडन्स आहे की त्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेल्या आहेत?

“सोलापूरात काँग्रेसने (Congress) मंगळवारी फटाके फोडले.” लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अद्याप महिना शिल्लक असतानाच आलेली ही बातमी अनेकांच्या भुवया उंचावणाऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळेच प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना नेमका कॉन्फिडन्स आहे की त्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेल्या आहेत? असा सवाल विचारला जात आहे. 2014 आणि 2019 मध्ये भाजपने सोलापूरमध्ये अगदीच नवखे उमेदवार दिले. पण लढत एकतर्फी जिंकली. यंदा प्रणिती शिंदे यांच्या रुपाने काँग्रेसने सोलापूरमध्ये फाईट दिली, भाजपला (BJP) घाम फोडला अशा चर्चा झाल्या. या चर्चा असतानाच प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी मतदानानंतर थेट फटाकेच फोडले आहेत. नेमकी काय गणित शिंदेंच्या बाजूने फिरली आहेत, त्यांना काय अंदाज त्यांना आला आहे? की काँग्रेसचे कार्यकर्ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेले आहेत? पाहुयात… (Is Praniti Shinde really confident of winning or is she over confident?)

राज्यात हायव्होल्टेज ठरलेल्या सोलापूर मतदारसंघात यंदा अवघं 57.46 टक्केच मतदान झालं. यात शहर उत्तरमध्ये – 56.81 टक्के, शहर मध्यमध्ये – 56.32 टक्के, दक्षिण सोलापूरमध्ये – 58.21 टक्के, मोहोळमध्ये 60.16 टक्के, अक्कलकोट – 55.31 टक्के आणि पंढरपूर-मंगळवेढ्यात – 58.09 अशी मतदानाची टक्केवारी राहिली. दुपारच्या सत्रातील वाढतं उन्हाचा परिणाम, राजकीय परिस्थितीमुळे मतदानाबद्दलची उदासीनता या गोष्टींचा राज्यातील पहिल्या दोन टप्प्यांप्रमाणेच सोलापूरमध्येही परिणाम जाणवला. मात्र हा परिणाम एवढा गंभीर होता की, 2019 च्या तुलनेत ही आकडेवारी तब्बल साडे बारा टक्क्यांनी घसरली आहे. 2019 मध्ये 65.06 टक्के मतदान झालं होतं. त्यामुळे घसरलेल्या मतदानाचा नेमका कोणाला फटका बसणार याची चर्चा सोलापूरमध्ये सुरु आहे.

”मी राज ठाकरे नाही; मेलो तरी चालेल पण कमळ, हात आणि धनुष्यबाणावर लढणार नाही”

सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या 21 उमेदवार रिंगणात आहेत. तरी प्रामुख्याने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे, महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यातच खरी लढत होत आहे. शिंदे यांच्यासाठी त्यांचे वडील ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत बेरजेचे राजकारण केले. अनेक नाराज नेत्यांना, छोट्यामोठ्या संघटना, गटांसह राजकीय पक्षांना त्यांनी जोडून घेतले. शहरात प्रणिती शिंदे यांना स्वतःच्या ताकदीसह काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार दिलीप माने, कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम, माजी महापौर महेश कोठे अशा नेत्यांचे बळ मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानेही प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला होता. शिंदेंसाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचीही सभा पार पडली. यामुळे त्यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात जनमत झुकेल अशी चर्चा आहे.

तर अक्कलकोटमध्ये माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, पंढरपूर – मंगळवेढ्यात भगीरथ भालके यांनी आपल्या गटाची ताकद शिंदेंच्या मागे उभी केली आहे. मोहोळमधून संजय क्षीरसागर यांच्यासारख्या 50 हजार मताचे पॉकेट बाळगून असलेल्या भाजपच्या नेत्याने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी आजवर राजन पाटील यांच्याविरोधात कडवी झुंज दिली आहे. मात्र आता आमदार यशवंत माने आणि राजन पाटील या दोघांनीही अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने पवार यांना इथून एक मोठा नेता हाताशी असणे गरजेचे होते. अशात क्षीरसागर यांच्यारुपाने पवारांनी ही पोकळी भरुन काढली. त्यामुळे प्रणिती शिंदेंना मोहोळमधूनही कितीचे मताधिक्य मिळणार हा चर्चेचा विषय ठरणार आहे.

जनता तुम्हाला गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही; बाळासाहेब थोरातांचा मोदींवर हल्लाबोल

दुसऱ्या बाजूला महायुतीचे सातपुते यांची जागा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेची केली आहे. तसेच लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विविध विधानसभा मतदार संघातील आमदारांची ताकदही त्यांच्या बाजूला आहे. शहरात विजय देशमुख आणि सुभाष देशमुख यांची ताकद सातपुतेंसाठी बुस्टर डोस ठरणारी आहे. तर अक्कलकोटमध्ये सचिन कल्याणशेट्टी यांनी सातपुतेंसाठी जोर लावल्याचे पाहायला मिळाले. मोहोळमध्ये तर विद्यमान आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील या अजित पवार यांच्या दोन्ही नेत्यांची साथ सातपुतेंना मिळाली आहे. राजन पाटील यांनी तर सातपुतेंना सर्वाधिक मताधिक्य मोहोळमधून देणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान औताडे यांनीही सातपुतेंसाठी कष्ट घेतले. सोबतच अभिजीत पाटील यांनीही अखेरच्या टप्प्यात सातपुतेंना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यांच्यासाठी सभाही घेतल्या. त्यामुळे इथे सातपुतेंसाठी दुहेरी वरदान मिळाले.

सातपुतेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभा घेतली. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभांचा धडाका लावला होता. भाजपमध्ये संघटन कौशल्यासाठी ओळखले जाणारे मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या सोलापूरचे पालकमंत्री आहेत. त्यांनीही मागच्या अनेक दिवसांपासून सोलापूरमध्ये फिल्डिंग लावली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांची फौज सातपुते यांच्यासाठी कामाला लागली होती. त्यामुळेच सातपुते यांचे पारडे जड दिसून येत आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे वंचितने पाठिंबा दिलेले उमेदवार, बसपा, छोटे पक्ष आणि अपक्ष हे उमेदवार कोणाची मते खाणार हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र सोलापूरकरांनी प्रणिती शिंदे की राम सातपुते, नेमके कोणाच्या झोळीत मतांचे दान टाकले आहे, याचे उत्तर येत्या चार जूनलाच मिळणार आहे.

follow us

वेब स्टोरीज