Download App

ऐन निवडणुकीत ज्योती मेटेंची अडचण… शासकीय नोकरीचा राजीनामा सरकारकडून ‘वेटिंगवर’

पुणे : बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून उमेदवारी मिळण्याच्या चर्चा असलेल्या शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख ज्योती मेटे (Jyoti Mete) यांचा पक्ष प्रवेश लांबणीवर पडला आहे. मेटे यांचा शासकीय नोकरीतील राजीनामा शिंदे सरकारकडून अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर किंवा त्या निवृत्त झाल्यानंतरच त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या तरी बीडमधून बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

बीड मतदारसंघ हा मुंडे कुटुंबियांचा बालेकिल्ला समजला जातो. 2009, 2014 या दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर 2014 च्या पोटनिवडणुकीत तब्बल सात लाखांच्या मताधिक्याने प्रीतम मुंडे विजयी झाल्या होत्या. त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा प्रीतम मुंडे यांनी संसद गाठली. मात्र त्यावेळी बजरंग सोनावणे यांनी त्यांना मोठे आव्हान दिले होते. त्यांच्याविरोधात सोनावणे यांनी तब्बल सव्वा पाच लाख मते घेतली होती. (Jyoti Mete’s resignation from the government job has not been approved by the Shinde government yet.)

भाजपात घमासान! माजी उपमुख्यमंत्र्यांची बंडखोरी; येदियुरप्पांच्या मुलाविरोधात ठोकला शड्डू

आता भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी जाहीर होणार याविषयी जिल्ह्यात उत्सुकता आहे. सुरुवातीला डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्या नावाची चर्चा होती. ते गावोगाव प्रचारही करीत होते. परंतु पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख आणि दिवंगत माजी आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचे नाव चर्चेत आले होते.

मराठवाड्यात सध्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने वातावरण तापले आहे. अशात ज्योती मेटे यांच्या सारख्या मराठा चेहऱ्याला उमेदवारी देऊन पंकजा मुंडे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करण्याची शरद पवार यांची खेळी होती. मात्र ज्योती मेटे या सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये सहाय्यक धर्मादाय आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा या पदाचा राजीनामा शिंदे सरकारकडून अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही.

पुण्यात भाजपला धक्का! माजी खासदार गिरीश बापट यांचे निकटवर्तीय शरद पवार गटात

त्यानंतर आता बजरंग सोनवणे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. सोनवणे यांनीही अजित पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. ते मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. दांडगा जनसंपर्क असणारा नेता म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्याकडे बीड राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद देखील होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोनवणे यांनी सव्वा पाच लाख मते घेत प्रीतम मुंडे यांना मोठे आव्हान दिले होते.

याशिवाय जिल्हा परिषदेतील सत्तापरिवर्तन, जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत चार मतदार संघात राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर करण्यात सोनावणे यांनी मोठी भूमिका बजावली होती. ते बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असून त्यांच्या पत्नी देखील माजी जिल्हा परिषद सदस्या आहेत. याशिवाय येडेश्वरी शुगर या खासगी साखर कारखान्याचे ते चेअरमन व कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. निवडणुकीवेळी मेटे यांचा राजीनामा मंजूर झाल्यास मेटे लोकसभेला तर सोनवणे यांना माजलगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यात आहे.

follow us