Download App

लोकसभेच्या रणसंग्रामातील काही लक्षवेधी लढती, काही उमेदवारांची संपत्ती पाहून व्हाल थक्क

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Loksabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. या रणसंग्रामात राजकीय पक्षाचे आणि अराजकीय पक्षाचे लोकं आपलं नशिब आजमावत असतात. देशभराता होऊ घातलेल्या या लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होत आहेत. (Loksabha Election) त्यातील पाच टप्प्यांत महाराष्ट्रातील निवडणुका होत आहेत. (Election Commission) या टप्प्यांसाठी वेगवेगळ्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, उमेदवार ज्यावेळी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतो तेव्हा त्याची संपती तो त्यामध्ये दाखवत असतो. त्यानुसार अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. (Nomination) त्यामधून महाराष्ट्रात काही लक्षवेधी लढती आहेत. त्यातील उमेदवार आणि त्यांची संपती किती हे  आपण आता जाणून घेऊ…

 

सुप्रिया सुळे

लोकसभेसभेची निवडणूक सर्वत्र होत असली तरी काही लढतींकडे मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे. या लढतींना आपल्याला लक्षवेधी लढती म्हणता येईल. सर्वात अगोदर आपण जाणून घेऊ बारामतीच्या विद्यमान खासदार आणि आता तिसऱ्यांदा महाविकास आघाडीकडून उमेदवार असलेल्या सुप्रिया सळे यांची संपत्ती किती आहे. सुप्रिया सुळे यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. यामध्ये सुप्रिया सुळे यांच्याकडे एकूण स्थूल मालमत्ता 38 कोटी रुपये इतकी आहे. तर, त्यांचे पती सदानंद सुळे यांची संपत्ती तब्बल एक अब्ज 14 कोटी इतकी असल्याचं समोर आलय. बाकी, सुप्रिया सुळे यांच्याकडे कोणतही वाहण नाही आणि हेलिकॉप्टर किंवा विमान नाही हेही यामधून समोर आलं आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार आणि त्यांच्या लोकसभेला प्रतिस्पर्धी असलेल्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याकडून एकूण 55 लाख उधार घेतले आहेत अशीही माहिती समोर आली आहे.

 

सुनेत्रा पवार

लक्षवेधी लढतीमध्ये सर्वात वरच्या स्थानी आहे ती बारामती लोकसभेची निवडणूक. येथे नणंद भावजयी अशी लढत आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या अर्धांगिणी सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यांनीही नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली एकूण संपत्तीची माहिती दिली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकुटुंबाकडे 127 कोटी 59 लाख 98 हजारांची मालमत्ता आहे. यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता एकूण 70 कोटी 95 लाख 99 हजार रुपयांची आहे. तर, अजित पवार यांच्याकडे एकूण 50 कोटी 40 लाख रुपयांची मालमत्ता आहे. यामध्ये सुनेत्रा पवार यांनी सासू आशाताई पवार यांना 82 लाख 81 हजार रुपये दिले आहेत. तर, अजित पवार यांना 63 लाख रुपये दिले आहेत. त्याचबरोबर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना 50 लाख रुपये तर नणंद सुप्रिया सुळे यांना 35 लाख रुपये दिले आहेत. तसंच, 12 कोटी 11 लाख रुपयांचं सुनेत्रा पवार यांच्यावर कर्जही आहे.

 

प्रणिती शिंदे

सोलापूर लोकसभेसाठी माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि विद्यमान काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे उमेदवार आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी प्रणिती शिंदे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार त्यांची संपत्ती 6 कोटी 60 लाख 70 हजार इतकी आहे. 2019 च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत 1 कोटी 81 लाख 42 हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे सलग तीनवेळा निवडून आल्या आहेत. त्यांनी 2019 ला विधानसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार चार कोटी 79 लाख 27 हजार इतकी त्यांची संपत्ती दाखवली होती. याचबरोबर प्रणिती शिंदे यांच्याकडे 300 ग्रॅम सोन्याचे दागिने असून, त्यांच्या नावे 6 एकर 30 गुंठे जमीन आहे. तसंच, मुंबईत दादर येथे आणि सोलापूरमध्ये त्यांच्या नावे एक घर आहे.

 

रविंद्र धंगेकर

वर्षभरापूर्वी पुण्यातील कसबा पेठेत झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्रासह देशाला परिचीत झालेलं नाव म्हणजे रविंद्र धंगेकर. भाजप आमदार मुक्त टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर ही पोट निवडणुक झाली होती. त्यामध्ये भाजपचेच उमेदवार निवडून येथील असं वातावरण निर्माण केलेलं असताना धंगेकरांनी सर्वांना धूळ चारली आणि विजयाचा गुलाल उधळला. त्यानंतर आता पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून पुन्हा धंगेकरांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. येथे तिरंगी लढत होत आहे. महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, मनसेला जय महाराष्ट्र करून वंचितमध्ये गेलेले वसंत मोर आणि महाविकास आघाडीकडून धंगेकर अशी ही तिरंगी लढत आहे. धंगेकर यांनी नुकताच उमेदवारी अर्ज जाखल केला आहे. त्यामध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञपत्रानुसार धंगेकर यांच्याकडे आठ कोटी 65 हजार स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. तर, धंगेकर यांच्यावर 71 लाख 15 हजार रुपयांचं कर्ज आहे. दरम्यान, धंगेकर आमदार झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीत वाढ नाही तर घट झाली आहे. धंगेकर कुटुंबाचा सोने-चांदी कारागिरी आणि बांधकाम व्यवसाय आहे.

 

नवणीत राणा

तिकीट मिळेल की नाही अशा परिस्थिती असणाऱ्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना भाजपने तिकीट देत पक्षातही घेतलं. त्यानंतर राणा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती किती आहे हे जाहीर केलं आहे. त्यांची संपत्ती त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये नवनीत राणा यांच्या संपत्तीमध्ये 41.87 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2019 च्या निवडणुकीत नवणीत राणा यांची जंगम आणि स्थावर मालमत्ता होती 11 कोटी 20 लाख 54 हजार इतकी. तर ती आता आहे 15 कोटी 89 लाख 77 हजार इतकी. अशा रितीने नवनीत राणा यांच्या संपत्तीत 4.69 कोटींची म्हणजे 41 टक्क्यांची वाढ झाली आहे.

 

प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर लोकसभेची निवडणुकही यावेळी मोठी लक्षवेधी होत आहे. अनेक उमेदवार तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करतात. मात्र, महायुतीकडून ज्यांना उमेवारी देण्यात आली ते भाजपचे आमदार सुधिर मुनगंटीवार हे आपल्याला लोकसभा लढवायची नाही. आपल्याला तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न करत होते. मात्र, त्यांना पक्षाने तिकीट दिल्याने ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, बाळू धानोरकर हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार होते. मात्र, त्यांच अकाली निधन झाल्याने त्यांच्या पत्नी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनीही नुकताच आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती जाहीर केली आहे. त्या प्रतिज्ञापत्रानुसार धानोरकर यांच्याकडे एकूण 80 कोटी 37 लाख 22 हजार इतकी संपत्ती आहे. यामध्ये स्थावर मालमत्ता 38 कोटी 61 लाख 52 हजार इतकी आहे. तर, जंगम मालमत्ता 41 कोटी 75 लाख 69 हजार इतकी आहे. त्याचबरोबर धानोरकर यांच्यावर 55 कोटी 23 लाख 86 हजार रुपयांच कर्ज आहे. यामध्ये गृहकर्ज, व्यावसायासाठीचे कर्ज, वाहन खरेदीसाठी कर्ज असं 15 कोटी 44 लाख रूपये आहे. तर, तात्पुर्त कर्ज म्हणून धानोरकर यांच्यावर तब्बल 39 कोटी रुपये इतकं कर्ज आहे.

 

राम सातपुते

सोलापूर लोकसभेची निवडणूक यंदा चांगलीच लक्षवेधी होत आहे. येथे एका बाजूला माजी मुख्यमंत्री सुशिल कुमार यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे या मैदानात आहेत. तर, महायुतीकडून विद्यमान भाजप आमदार राम सातपुते आहेत. राम सातपुते यांनी नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केला. सातपुते हे कायम आपण गरिब कुटुंबातील आहोत. आपण एका उसतोड कामगाच्या घरातील आहोत असा दावा करत असतात. मात्र, सातपुते यांच्या संपत्तीचा आकडा समोर आल्याने विरोधकांनी सातपुतेंवर चांगलीच टीका केली आहे. सातपुते यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 92 लाख इतकी संपत्ती आहे. यामध्ये जंगम आणि स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. सातपुते कुटुंबाजवळ 16 तोळे सोनेही आहे. तर, बुलेटसह तीन दुचाकी आहेत. तर, सातपुते यांच्याकडे 13 लाख 13 हजार रुपयांची संपत्ती आहे.

 

शशिकांत शिंदे

साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटलांनी उमेदवारी घेण्यास नकार दिल्याने राष्ट्रवादीने आमदार शशिकांत शिंदे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. तर, भाजपने छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे. शशिकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे त्यामध्ये त्यांनी आपली संपत्ती सादर केली आहे. त्यानुसार, शशिकांत शिंदे यांच्याकडे 50 कोटींपेक्षा अधिकची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. यामध्ये शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नीकडील जंगम मालमत्तेची किंमत 16 कोटी 38 लाख 34 हजार इतकी आहे. तर, 36 कोटी 92 लाख 35 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्याचबरोबर शिंदे यांच्यावर 8 कोटी 49 लाख रुपये इतकं कर्जही आहे. तर, त्यांच्या पत्नीवर 7 कोटी 48 लाख रुपयांचं कर्ज आहे.

 

अमोल कोल्हे

राष्ट्रवादीची दोन शकल झाली आणि एका पक्षातील लोक एकमेकांची विरोधक झाली. ज्या राष्ट्रवादीत आमोल कोल्हे यांना मी आणलं असा दावा अजित पवार करतात त्यांची राष्ट्रवादी आता भाजपसोबत आहे. तर, आम्ही एकनिष्ठ आहोत असा जयघोष करणारे अमोल कोल्हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. कोल्हे यांनी कालच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी जे प्रतिज्ञापत्र दाकल केल त्यामध्ये त्यांनी आपली संपत्तीची माहिती दिली आहे. त्यामधून समोर आलेल्या माहितीनुसार अमोल कोल्हे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात दुप्पट वाढ झाली आहे. कोल्हे यांच्या कुटुंबीयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता सुमारे आठ कोटी 42 लाख रुपये इतकी आहे. ती गेल्यावेळी म्हणजे 2019 ला सुमारे साडेचार कोटी रुपयांची मालमत्ता होती. ती आता आठ कोटी झाली आहे. कोल्हे यांच्यावर दोन कोटी 99 लाख 65 हजार इतकं कर्जही आहे.

 

श्रीमंत शाहू छत्रपती

कोल्हापूर राज घराण्याचे वारसदार श्रीमंत शाहू छत्रपती हे महाविकास आघाडीकडून लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांनी नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी त्यानी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे त्यामध्ये शाहू महाराजांची संपत्ती किती ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार त्यांच्या नावे स्थावर व जंगम अशी मिळून 297 कोटी 38 लाख 8 हजार रूपयांची संपत्ती आहे. यामध्ये 147 कोटी 64 लाख 49 हजारांची जंगम मालमत्ता आहे. तर 149 कोटी 73 लाख 59 हजारांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे यांच्या नावे 41 कोटी 6 लाखांची संपत्ती आहे. त्यापैकी 17 कोटी 35 लाख जंगम आणि 23 कोटी 71 लाख स्थावर मालमत्ता आहे. यामध्ये 1 कोटी 56 लाखांचे सोन्याचे आणि 55 लाखांचे चांदीचे दागिने आहेत. तर 6 कोटींची वाहनं त्यांच्या नावावर आहेत. 122 कोटी 88 लाखांची शेतजमीन आहे. पत्नीच्या नावार देखील 7 कोटी 52 लाखांची शेतजमीन आहे.

 

छत्रपती उदयनराजे भोसले

गेली अनेक दिवसांपासून तिकीट मिळेल की नाही अशी चर्चा चालू असताना अखेर भाजपने राज्यसभेचे विद्यमान खासदार उमेदवार उदयनराजे भोसले यांना तिकीट दिलं आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादीकडून निवडणून आल्यानंतर अवघ्या एक वर्षानंतरच उदयनराजे यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंर पवारांनी आपले जुने मित्र श्रीनिवास पाटील यांना तिकीट दिलं. त्यानंतर ही लढत महाराष्ट्राता गाजली. पवारांनी भर पावसात सभा घेतली आणि निवडणुकीचं वातावरण फिरलं. अखेर, उदयन राजेंचा पराभव करत श्रीनीवास पाटील निवडून आले. आता भाजपाकडून उदयनराजे निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती सादर केली आहे. त्यानुसार जमीन, सोने, चांदी, गाड्या-घोडे अशा संपत्तीची माहिती दिली आहे. भोसले कुटुंबाची संपत्ती 2 अब्ज 96 कोटी 39 लाख 11 हजार 585 रुपये इतकी आहे. त्यामध्ये उदयनराजेंकडे मारुती जिप्सी, ऑडी, दोन मर्सिडीज बेंज , फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ, ट्रॅक्टर 2, एस क्रॉस अशा गाड्या आहेत.

follow us

वेब स्टोरीज