Jalgaon Lok Sabha Politics : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत काही (Jalgaon Lok Sabha) केल्या जागावाटपाचा तिढा सुटताना दिसत नाही. एका पक्षाने उमेदवार जाहीर केला की दुसऱ्या पक्षाकडून त्याला विरोध होतो. असाच प्रकार याआधी हिंगोली मतदारसंघात घडला होता. येथे शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की एकनाथ शिंदे यांच्यावर ओढवली होती. आता असाच प्रकार जळगावच्याबाबतीतही होताना दिसत आहे.
विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर येथील राजकीय गणिते बदलली आहेत. भाजपाची धाकधूक वाढली आहे. अशा परिस्थितीत येथील उमेदवार बदलण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्याची माहिती आहे. या मतदारसंघात भाजपने उन्मेष पाटील यांना डावलून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या उन्मेष पाटील यांनी थेट ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाने येथे पाटील यांचे निकटवर्तीय करण पवार यांना उमेदवारी दिली.
Unmesh Patil News : महायुतीला जळगावचा पेपर टफ! भाजपवर हल्लाबोल करत उन्मेश पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश
ठाकरे गटाच्या या चालीने भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यामु्ळेच स्मिता वाघ यांच्याऐवजी ए टी पाटील यांना तिकीट देण्याचा विचार सुरू झाला आहे. ए टी पाटील यांनी नवी दिल्लीत भाजप नेत्यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे.
ठाकरे गटाने करण पवार यांना तिकीट दिलं आहे. करण पवार यांची एरंडोल पारोळा मतदारसंघात मोठी ताकद आहे. त्यामुळे 2019 मध्ये संधी न मिळालेल्या माजी खासदारांना रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न होतो आहे. मात्र येथे अशा काही घडामोडी सुरू आहेत याबाबतचे वृत्त मंत्री गिरीश महाजन यांनी फेटाळून लावले आहे. तसेच ए टी पाटील यांनीही या चर्चांना दुजोरा दिलेला नाही. परंतु, त्यांनी नुकतीच नवी दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा मात्र आहे.
महायुतीचे 13 शिलेदार ठरले : मुंबईतील चार अन् जळगाव, रावेर मतदारसंघात धक्कादायक नावे?
दरम्यान, याआधी 2019 मधील लोकसभा निवडणुकीसाठी स्मिता वाघ इच्छुक होत्या. त्यांच्या उमेदवारीची घोषणा भाजपने केली होती. त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली होती. परंतु, नंतर भाजपने उन्मेष पाटील यांचं नाव पुढं केलं. त्यावेळी वाघ यांनी कोणतीच नाराजी दाखवली नाही. उन्मेष पाटील यांचा प्रचारही केला होता. आता उन्मेष पाटील भाजपसोडून ठाकरे गटात गेले आहेत. स्मिता वाघ या पुन्हा उमेदवार आहेत. परंतु, काही घडामोडींमुळे मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली आहेत. अशा परिस्थितीत स्मिता वाघ यांचं तिकीट खरंच रद्द होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.