सोलापूर : मोहिते-पाटील कुटुंबियांचा निर्णय होत नसेल तर मी ‘तुतारी’ चिन्हावर माढ्यातून लढायला तयार आहे, असे म्हणत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी स्वतः याबाबत माध्यमांना माहिती दिली. गायकवाड यांना पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाते. दरम्यान, त्यांच्या या दाव्यानंतर बहुचर्चित माढा लोकसभा मतदारसंघात आता आणखी एका नव्या भिडूने शड्डू ठोकला आहे. Pravin Gaikwad Meet Sharad Pawar in Delhi for Mhada seat from NCP (Sharadchandra Pawar ) party
धैर्यशील मोहितेंकडून महायुतीकडे उमेदवारीची मागणी केली जात होती. परंतु, भाजपने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा मैदानात उतरवले आहे. यानंतर मोहिते पाटील कुटुंबीय कमालीचे नाराज झाले आहेत. त्यांनी भाजपविरोधात रान उठवण्यास सुरुवात केली होती. पण भाजपने उमेदवार बदलणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. तेव्हापासून मतदारसंघात धैर्यशिल मोहित पाटील यांनी बंडखोरी करुन अपक्ष उभे रहावे किंवा तुतारीच्या चिन्हावर उभे रहावे अशी समर्थकांची मागणी सुरु आहे. तेव्हापासून मोहिते पाटील घराणे पुन्हा राष्ट्रवादीमथ्ये परतणार अशी चर्चा सुरु आहे.
अशात शरद पवार यांचे विश्वासू समजल्या जाणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतली. त्यांनी एकत्रित एका कार्यक्रमात सहभागही घेतला. त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनीही राष्ट्रवादीची तुतारी घेणार असल्याचे जवळपास ठरले आहे, पण अंतिम निर्णय होईपर्यंत थांबा असे माध्यमांना सांगितले. मात्र दुसऱ्या बाजूला अद्यापही भाजपकडून मोहिते पाटील यांची भाजपकडून मनधरणी सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर धैर्यशील मोहिते-पाटील यांनीही मतदारसंघात करमाळा, सांगोला, माढा, माळशिरस, फलटण, माण-खटाव परिसरात गेल्या आठवड्यापासून सुरू केलेला गावभेट दौरा थांबविला होता.
अद्यापही मोहिते-पाटलांचे नेमके काय ठरले आहे, याचा अंदाज लावता येत नाही. त्यामुळेच त्यांचा निर्णय होत नसेल तर मी ‘तुतारी’ चिन्ह घेऊन माढ्यातून लढायला तयार आहे, असे म्हणत प्रवीण गायकवाड यांनी माढ्याच्या मैदानात उडी घेतली आहे. पवार यांनीही गायकवाड यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून तयारी सुरु करण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती आहे. मोहिते पाटील नसतील तर गायकवाड यांच्याशिवाय सामाजिक कार्यकर्ते अभयसिंह जगताप, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख किंवा दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचेच नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याही नावाची चर्चा आहे.