पुणे : मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकांप्रमाणेच यंदाही महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यांत मोदींच्या पाच सभा झाल्या असून पुढील चार दिवसांत आणखी सात सभांचे नियोजन आहे. त्यात नंतरच्या दोन टप्प्यांतील आणखी सभांची भर पडणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याही सभांसाठी उमेदवार आग्रही आहेत. शहा यांच्या आतापर्यंत पाच जाहीर सभा झाल्या आहेत. पुढील तीन टप्प्यांमध्येही त्यांच्या सभांची संख्या वाढणार आहे. (Prime Minister Narendra Modi’s rally is in high demand in all five phases of polling in Maharashtra.)
लोकसभेसाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच जागांवर मतदान झाले. या टप्प्यासाठी मोदी यांची रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि वर्ध्यामध्ये सभा झाली. दुसऱ्या टप्प्यात नांदेड आणि परभणीमध्ये सभा पार पडली. आता शुक्रवारी (26 एप्रिल) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर शनिवारपासून मोदींचा पुन्हा महाराष्ट्र दौरा सुरू होणार आहे. यात त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील सभांचा धडका पार पडणार आहे.
पंतप्रधान मोदी यांची 27 एप्रिलला कोल्हापूरला सभा होणार आहे. त्यानंतर 29 एप्रिलला सोलापूर, कराड आणि पुण्यात सभा पार पडणार आहे. पुण्यात ‘रोड शो’चीही तयारी करण्यात आली आहे. 29 एप्रिलला मोदी पुण्यात मुक्कामी असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 एप्रिलला माळशिरस, धाराशिव आणि लातूरला सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसांत राज्यातील जवळपास दहा मतदारसंघांतील मतदारांवर पंतप्रधान मोदींची नजर असणार आहे.
याशिवाय चौथ्या टप्प्यात अहमदनगर, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सभांचे नियोजन झाले आहे. त्यानंतर होणाऱ्या अखेरच्या पाचव्या टप्प्यातही मुंबईत मोदी यांची मोठी जाहीर सभा घेण्याची तयारी सुरू झाली आहे. नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघासाठी महायुतीची संयुक्त सभाही होणार आहे.