रुग्णसेवा ते राजकारण; समाजातील मूळ समस्या दूर करण्यासाठी डॉ. सुहास कांबळे राजकारणात सक्रिय
डॉ. कांबळे यांचा समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या नागरी व आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय.
Dr. Suhas Kamble is active in politics : भोसरीतील प्रभाग क्र. 8 मधून डॉ. सुहास कांबळे(Dr. Suhas Kambale) हे येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली नवी राजकीय(Politics) इनिंग सुरू करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत कार्यरत असलेल्या डॉ. कांबळे यांनी समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या नागरी व आरोग्यविषयक समस्या अधिक व्यापक पातळीवर सोडवण्यासाठी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.
डॉ. कांबळे म्हणाले की, आतापर्यंत मी रुग्णालयाच्या चौकटीत राहून रुग्णांची सेवा करत आलो आहे. मात्र केवळ उपचार करूनच आरोग्य समस्या सुटत नाहीत. नागरिक आजारी पडूच नयेत यासाठी समाजातील आरोग्यविषयक प्रश्न, स्वच्छ पाणीपुरवठा, अपघात प्रतिबंधक उपाययोजना यांसारख्या मूलभूत बाबींवर काम होणं गरजेचं आहे. हे काम रुग्णालयाच्या सीमेबाहेर जाऊनच करता येईल, ही जाणीव मला झाली आणि त्यामुळेच राजकारणात उतरायचा निर्णय घेतला.
राजकारणाकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. सुशिक्षित आणि उच्चशिक्षित लोकांनी राजकारणात उतरलं पाहिजे. दुर्दैवाने राजकारणाकडे आजही अनेक जण निगेटिव्ह भावनेने पाहतात. राजकारण म्हणजे केवळ टीका-टिप्पणी किंवा आरोप-प्रत्यारोप नव्हे. तर समाजबदलाचं ते एक प्रभावी माध्यम आहे. याच विचारातून मी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला, असं डॉ. कांबळे म्हणाले. आमदार महेश लांडगे यांनी राजकारणात येण्याचा सल्ला दिल्यानंतर पक्षात प्रवेश करून काम करण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजप हा कृतीतून टीकेला उत्तर देणारा, प्रगतिशील विचारांचा पक्ष आहे. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Video : आज 31 डिसेंबर! पुणे-मुंबईसह देशातील महत्वाच्या शहरात पोलीस तैनात, दिला कडक इशारा
आपल्या कार्यपद्धतीबाबत बोलताना डॉ. कांबळे म्हणाले, डॉक्टर म्हणून उपचार करताना सर्वप्रथम रुग्णाचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. त्याला नेमकं काय होतंय हे समजून घेतल्यानंतरच उपचार करता येतात. राजकारणातही हीच पद्धत मी अवलंबणार आहे. लोकांचे प्रश्न आधी ऐकून घ्यायचे आणि त्यानंतर त्यावर योग्य उपाययोजना करायच्या. सभा गाजवणं, केवळ राजकीय भाषणं करणं हा माझा स्वभाव नाही. राजकारणात आलो तरी माझ्या बोलण्यात फारसा बदल होणार नाही.
इंद्रायणी नगर, संतनगर परिसरातील नागरिकांच्या गरजा आणि समस्या आपण जवळून समजून घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. मागील सत्ताधाऱ्यांनी या भागात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून प्रशासक राजवटीमुळे अनेक समस्या प्रलंबित राहिल्या. त्या आजही नागरिकांना भेडसावत आहेत, असं त्यांनी नमूद केलं.
नगरसेवक म्हणून काम करताना प्रभागातील प्राथमिक नागरी समस्यांवर सर्वप्रथम लक्ष दिलं जाईल, असं सांगत डॉ. कांबळे म्हणाले, पुढील टप्प्यात प्राधिकरण क्षेत्रातील विविध अडचणी सोडवण्यासाठीही प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर समाजातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यावर माझा भर असेल. एकूणच, डॉक्टर म्हणून ज्या निष्ठेने आणि प्रामाणिकपणे मी रुग्णसेवा केली, त्याच जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने नगरसेवक म्हणूनही समाजसेवा करणार असल्याचा विश्वास डॉ. सुहास कांबळे यांनी व्यक्त केला आहे.
