कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या (Congress) तिकीटावर शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणाही लवकरच होण्याची शक्यता आहे. अशातच महायुतीकडून शिवसेनेचे (ShivSena) विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना थांबवून शिवसेनेच्या किंवा भाजपच्या तिकीटावर राजे समरजीतसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांना उमेदवारी देण्याबाबतची चाचपणी सुरु असल्याची माहिती आहे. दरम्यान, घाटगे यांच्याही उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यास राजघराणे विरुद्ध राजघराणे अशी लढत होण्याची शक्यता आहे. (Samarjit Singh Ghatge is likely to be nominated by BJP from Kolhapur Lok Sabha constituency.)
कागलच्या घाटगे घराण्यात समरजितसिंह यांचा जन्म झाला. घाटगे घराणे हे राजर्षी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराणे होय. याच घराण्यातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज दत्तक म्हणून गेले होते. समरजितसिंह घाटगे यांचे वडील आणि माजी आमदार विक्रमसिंह घाटगे हे काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्यानंतर समरजीतसिंह घाटगे यांनीही सहकारी संस्थांच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. पुढे कागलचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते हसन मुश्रीफ यांना शह देण्यासाठी 2016 मध्ये समरजीतसिंह घाटगे यांनी भाजपची वाट धरली. त्यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली.
घाटगे यांच्या भाजप प्रवेशापूर्वी किंवा प्रवेशानंतरही हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यातील वैर लपून राहिले नाही. भाजप प्रवेशानंतरच घाटगे यांनी विधानसभेची तयारी सुरु केली. कागल मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीकडून 1999 पासून सलग पाच वेळा निवडून आले आहेत. मात्र 2019 ला समरजित घाटगे यांनी चांगलेच आव्हान निर्माण केले होते. शिवसेना- भाजपची युती असतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्याने घाटगे यांनी शिवसेनेच्या संजय घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्याविरोधात अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली. मात्र यात हसन मुश्रीफ यांचा विजय झाला.
अशात मुश्रीफ अजित पवार यांच्यासोबत महायुतीमध्ये आल्याने समरजीतसिंह घाटगे यांची चांगलीच कोंडी झाली. आताही कागलमधून हसन मुश्रीफ यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समरजीतसिंह घाटगे यांना लोकसभेत पाठवून तिथले समीकरण सोडविण्याची महायुतीची रणनीती असल्याचे बोलले जाते. यासोबतच महविकास आघाडीने छत्रपती घराण्यात उमेदवारी दिल्याने महायुतीने देखील राजघराण्यात उमेदवारी देण्याची तयारी केली असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे जरी कोल्हापूरची जागा शिवसेनेला गेली तरीही समरजीतसिंह घाटगे यांना शिवसेनेतून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असून त्यासाठी घाटगे तयार असल्याची माहिती आहे.