महायुतीला मोठा धक्का : अजितदादांचा भाजपविरोधात लढण्याचा निर्णय; सर्वच जागांवर स्वबळाचा हुंकार!

महायुतीला मोठा धक्का : अजितदादांचा भाजपविरोधात लढण्याचा निर्णय; सर्वच जागांवर स्वबळाचा हुंकार!

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील (Maharashtra) जागा वाटपाचा मुद्दा अद्याप मार्गी लागलेला नाही, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या तिन्ही पक्षातील कोणता पक्ष, किती आणि कोणत्या जागा लढवणार यावर अद्यापही एकमत झालेले नाही. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने अरुणाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar), कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. (NCP has decided to contest the assembly elections in Arunachal Pradesh on its own.)

आगामी लोकसभा निवडणुकीसोबतच अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकतीच अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये अरुणाचल प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष लिखा साया आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्य़ांची एक बैठक पार पडली. याच बैठकीत सर्व 60 जागांवरील स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपसोबत निवडणुकीसाठी कोणतीही आघाडी केली जाणार नसून निवडणुकीनंतर गरज पडल्यास भाजपसोबत आघाडी केली जाईल, असे याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

रोहित पवारांची अजितदादांवर जहरी टीका : धरण, सिंचन सगळच काढलं

अरुणाचल प्रदेशमध्ये सध्या भाजपची सत्ता असून 60 पैकी 54 आमदार भाजपचे आहेत. तर नॅशनल पीपल्स पक्षाचे दोन आणि एका अपक्षाचाही भाजपला पाठिंबा आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपप्रणित एनडीए, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सातत्याने आपली ताकद वाढविताना दिसत आहे. नुकतेच विरोधी काँग्रेसच्या चार आमदारांपैकी विधीमंडळ पक्ष नेत्यांसह तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता भाजपला आपल्याच एका मित्रपक्षाकडून स्वबळाची घोषणा झाल्याने मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

नागालँडमध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद :

अरुणाचल प्रदेशचे शेजारी राज्य नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद आहे. गतवर्षी झालेल्या नागालँड विधानसभा निवडणुकीत पक्षाचे सात आमदार निवडून आले. मात्र त्यानंतर तेवढ्याच आश्चर्यकारकपणे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी या आमदारांची ताकद नागालँडमधील सत्ताधारी एनडीए आघाडीच्या मागे उभी केली. त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ झाली. महाराष्ट्रात अजित पवार यांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीला शरद पवार यांच्यापासून वेगळे होत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर 20 जुलै रोजी नागालँडमधील राष्ट्रवादीच्या सर्व सात आमदारांनीही अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube