नाशिक : नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे तसे शांत आणि संयमी समजले जातता. आधी मनसे आणि आता शिवसेना (Shivsena) अशा पक्षांमध्ये काम करुनही गोडसे इतर आमदार-खासदारांप्रमाणे कधी आक्रमक झालेले ऐकीवात नव्हते. गत दोन दिवसांपासून मात्र ते आक्रमक झालेले दिसून येत आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी जाऊन ठिय्या दिला. दादा भुसे (Dada Bhuse) आणि गोडसे यांच्यातील सुप्त संघर्ष नवीन नाही. पण ते भुसेही गोडसेंसोबत या ठिय्यामध्ये होते. कारण एकच भाजप, राष्ट्रवादी आणि मनसेच्या दाव्यांमुळे आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे वादात सापडलेल्या नाशिक लोकसभेच्या जागेवर शक्य तितक्या लवकर उमेदवारी जाहीर करा. (Shiv Sena MP from Nashik Hemant Godse went to Chief Minister Eknath Shinde’s residence and protested.)
खरंतर इथे गोडसे यांच्याकडे एक प्रातिनिधिक स्वरुपात बघता येईल. कारण शिंदेंसोबत आलेल्या इतर 12 खासदारांची आणि इच्छुक नेत्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. विद्यामान खासदार असलेल्या पक्षाला संबंधित जागा सोडण्याबद्दल महायुतीच्या नेत्यांमध्ये एकमत असल्याचे सांगत भाजपने अनेक जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. शिवसेनेला मात्र त्या निकषाच्या आधारे अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर करता आले नाहीत. यातील काही खासदारांचा पत्ता कट होण्याची चर्चा आहे तर काही जागांवर भाजप, राष्ट्रवादी किंवा मनसेचा डोळा आहे. त्यामुळे तिथल्या खासदारांना किंवा इच्छुकांना भाजपच्या किंवा राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. हेच कारण आहे ज्यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि इच्छुक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. खासदारांच्या याच अस्वस्थतेला गोडसे यांनी वाट मोकळी करुन दिल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेकडे असलेल्या रामटेकमध्ये कृपाल तुमाने, यवतमाळ-वाशिमच्या भावना गवळी, हिंगोलीचे हेमंत पाटील, हातकणंगलेचे धैर्यशील माने, कोल्हापूरचे संजय मंडलिक अशा खासदारांना उमेदवारी नाकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर शिवसेनेकडील ठाणे, अमरावती, पालघर या जागांवर भाजपचा, धाराशिव, परभणी आणि साताऱ्यावर राष्ट्रवादीचा दावा आहे. याशिवाय नाशिक, दक्षिण मुंबई आणि शिर्डी या जागांवर मनसेचा डोळा आहे. त्यामुळे इथल्या इच्छुकांनी आधीच देव पाण्यात ठेवले आहेत. नाशिकवर मनसेसह भाजप आणि राष्ट्रवादीनेही हक्क सांगितला आहे. त्यामुळे गोडसेंसमोरच्या अडचणी वेगळ्या आहेत.
काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची केलेली घोषणा केली होती. पण गोडसे यांच्यारुपाने सेनेच्या ताब्यातील हा मतदारसंघ खेचून घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी ही घोषणा रुचली नाही. गोडसे यांच्यावर युतीधर्म पाळला नसल्याचे टिकास्त्र सोडले. भाजप एकतर उमेदवार बदला अन्यथा, जागा आम्हाला द्या, या भूमिकेवर अडून बसल्याचे सांगितले जाते.
नाशिकमधील देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांच्यासह इच्छुकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. छगन भुजबळ हेही लोकसभेसाठी इच्छुक असून नाशिक मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. एका बाजूला दोन्ही मित्रपक्षांचा विरोध असतानाच दुसऱ्या बाजूला कधीकाळी बालेकिल्ला असलेल्या मनसेनेही नाशिकवर दावा सांगितला आहे. मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तर नाशिकमधून राज ठाकरे यांनी स्वतः निवडणूक लागवावी, अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे.
याच दावे आणि प्रतिदाव्यांमुळे गोडसे अस्वस्थ आहेत आणि याचीच परिणती मुख्यमंत्र्यांच्या ठाणेस्थित निवासस्थानासमोरील ठिय्यात झाली. आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीची प्रतिमा मलीन होत आहे, मतदारांमध्ये चुकीचा संदेश जात आहे, लवकरात लवकर उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी गोडसे यांनी केली. मात्र प्रत्यक्षात एका खासदाराचे जरी तिकीट कापले तरी आम्ही किती आक्रमक होऊ शकतो? आम्ही थेट तुमच्या घरावर येऊन धडकण्यासही मागे-पुढे बघणार नाही, असा संदेश गोडसे यांनी दिल्याची चर्चा आहे.