राज ठाकरे यांच्यामार्फत शिंदेंना संपविण्याचा डाव, कोणी आखलाय?
मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना भेटले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्याने पत्ते पिसण्याचे काम सुरू झाले. लोकसभा निवडणुकीसाठी राज यांना सोबत घेण्यासाठी ही बैठक असल्याचे सांगण्यात आले. पण या भेटीच्या अनुषंगाने अनेक धक्कादायक खुलासे माध्यमांत झळकत आहेत. त्यात तथ्य किती, सत्यता किती याचा कोणी विचारही करायला तयार नाही. पण यातील काही बाबी प्रत्यक्षात आल्या तर यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय कडेलोट होऊ शकतो, हे मात्र निश्चित.
असा कोणता प्रस्ताव शिंदे यांच्या माथ्यावर मारण्यात येत आहे, याची माहिती या निमित्ताने घेऊ या. आधी म्हटल्याप्रमाणे भाजपवर कठोर टीका करणारे राज ठाकरे हे अमित शहांना भेटले. खरे तर हा राज यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीतील पुन्हा नवीन यू टर्न होता. २०१४ मध्ये मोदींचे गुणगाण, २०१९ मध्ये भाजपवर टीका करण्याची उलटसुलट भूमिका राज यांनी घेतली. २०२४ मध्ये ते काय करणार, याची उत्सुकता होतीच. उद्धव ठाकरे हे काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा राज यांनी आपलासा केला. त्यातूनच ते भाजपच्या जवळ जाणार, अशी अटकळ होती. तशी पावले पडूही लागली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या काही वाक्यांतून त्याचे संकेत मिळत होते. त्यानुसार राज ठाकरे आणि अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट झाली. सोबत राज यांचे पुत्र अमित ठाकरे हे होते. त्यामुळे या तिघांत काय संवाद झाला, हे फक्त या तिघांनाच माहिती आहे. त्यानंतर राज हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना भेटले. या साऱ्या घडामोडींनंतर राज यांनी कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. मनसे हे महायुतीत जाणार आणि लोकसभेच्या एक किंवा दोन जागा महायुतीमार्फत लढविल्या जाणार, अशीच साऱ्यांची अटकळ होती.
CM शिंदेंच्या शिवसेनेचे राज ठाकरे पक्षप्रमुख होणार? महायुतीचा धडकी भरवणारा प्रस्ताव
मात्र या अंदाजापेक्षा व्यापक प्रस्ताव भाजपने राज यांच्यासमोर ठेवल्याचे वृत्त झळकले. राज यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रमुख व्हावे, असा हा प्रस्ताव आहे. राज यांच्यासोबत भाजपची युती पुढील काळात आणखी भक्कम करण्यासाठी असे करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. ठाकरे हे नाव शिवसेनेसाठी आवश्यक असल्याने शिंदे यांच्यासाठीह ही बाब फायदेशीर ठरेल, असेही एक कारण देण्यात आले. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना सध्या होत आहे. यात उद्धव यांना सहानुभूती मिळत आहे. ती कमी करायची असेल तर उद्धव यांच्यासमोर राज ठाकरे हेच नाव हवे, असेही या मागचे गणित आहे. थोडक्यात राज यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही शिवसेनेत विलीन करायची आणि राज यांनी शिवसेनेचे प्रमुख व्हायचे. राज हे प्रमुख झाले तरी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला कोणताही धोका होणार नाही, याचीही हमी भाजपने घेतल्याचे वृत्तात म्हटले आहे.
आता हे सारे एकनाथ शिंदे यांच्या गळी उतरविण्याची सारी जबाबदारी भाजपन घेतली आहे. हा प्रस्ताव एकनाथ शिंदे का मंजूर करतील, असाही प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंशी संघर्ष करून शिंदे स्वतः मुख्यमंत्री झाले. ५० आमदार आणि १३ खासदार त्यांनी आपल्या सोबत घेतले. शिवसेना ही चिन्हासह आपल्याकडे खेचून आणली. ही शिवसेना राज यांच्या हातात अलगदपणे सोपविण्याचा विचार तरी ते का करतील? यात त्यांचा कोणता फायदा होणार आहे? शिंदे यांची आगामी काळातील किमान कामगिरी झाली असे समजले तरी ते ४-५ खासदार आणि २० ते २५ आमदार असलेल्या पक्षाचे प्रमुख असतील. कदाचित ते यापेक्षा अधिक सरस कामगिरीही करू शकतील. याउलट राज ठाकरे यांच्याकडे एकच आमदार आहे. केवळ ठाकरे हे आडनाव आहे म्हणून राज यांच्याकडे पक्ष सोपविण्याचा प्रस्ताव शिंदे हे कधीच मान्य करणार नाहीत.
दुसरीकडे राज ठाकरे हे स्वयंभू नेते आहेत. त्यांनी आपल्या घामातून आणि रक्तातून मनसे हा पक्ष उभा केला आहे. त्यांनाही मनसेची ओळख पुसणे कसे शक्य होईल? पण केवळ कल्पनेतील भराऱ्या म्हणजेच बातम्या असे सध्या घडत असल्याने असा कथित प्रस्ताव माध्यमांत झळकला असेल का?
भाजपमधील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. म्हणजे या प्रस्तावामागे भाजपचे डोके असल्याचे स्पष्ट होते. या प्रस्तावाच्या आडून शिंदे यांचे खच्चीकरण करण्याचा तर प्रयत्न नाही ना, अशी शंका आता व्यक्त होत आहे. आपल्या मित्रपक्षांना संपविणारा म्हणून भाजपची ओळख आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्ष संपवायला तर भाजप निघाला नाही ना, अशी शंका आता त्यांच्या कार्यकर्त्यांना येत आहे. शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया अशीच भावना व्यक्त करणारी होती. त्यांनीही या चर्चांत काही तथ्य नसल्याचे सांगितले. आमच्या पक्षाचे अध्यक्ष शिंदे हेच राहतील, दुसरा प्रस्ताव आम्ही स्वीकारणार नाही, असेही शहाजीबापूंनी स्पष्ट केले आहे. तरीही एकनाथ शिंदे यांच्यासाी धोक्याची घंटी वाजली आहे, हे निश्चित.
शिर्डी-ठाण्यात एकनाथ शिंदेंचा धक्का; संभाव्य उमेदवारांची यादी तयार
राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे वाक्य सर्रासपणे फेकले जाते. पण शिवसेना फोडून भाजपशी मैत्री केल्यानंतर आपल्याला राज ठाकरे यांच्या रूपाने असे बक्षीस देण्याचा हा प्रस्ताव ऐकून एकनाथ शिंदे यांच्याही डोळ्यासमोर काजवे चमकले असतील. अर्थात या वृत्तात आधी म्हटल्याप्रमाणे सत्यता किती याचाही शोध घेण्याची गरज आहे. अनेकदा सांगोवांगीच्या चर्चा या बातम्या म्हणून देण्यात येतात. त्याच मालिकेतील हा प्रस्ताव असण्याची दाट शक्यता आहे.
राज्याच्या राजकारणात २०१९ पासून अनेक धक्कादायक बाबी घडल्या आहेत. ज्यांचे शत्रूत्व होते ते मित्र झाले. जे मित्र होते ते हाडवैरी झाले. पवार कुटुंब फुटले. शिवसेनेचे दोन भाग झाले. रात्रीपर्यंत काॅंग्रेसनिष्ठ असलेला नेता सकाळी भाजपचे उपरणे घालताना दिसला. त्यामुळे कोणत्याही अकल्पित घटना महाराष्ट्रात घडू शकतात, असे माध्यमांना वाटू लागले आहे. त्यातूनच राज ठाकरे हे शिवसेनाप्रमुख होणार असल्याचे वृत्त झळकले आहे. प्रत्यक्षात जे घडणार असते ते माध्यमांना कधीच कळत नसते. तोपर्यंत राजकीय पतंगबाजी सुरू असते. त्यामुळेच ही न घडणारी शक्यता रंगवून सांगितली जात आहे. पण अशी चर्चा देखील एकनाथ शिंदे यांची धाकधूक वाढविणारी आहे, हे निश्चित.