Download App

पश्चिम महाराष्ट्रात ‘मशाल’ पेटण्यापूर्वीच विझणार; पाटील, कदम अन् पवारांकडून ‘ठाकरेंचा’ करेक्ट कार्यक्रम

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि विश्वजीत कदम या तिघांच्या खेळीमुळे यंदा लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट पूर्णपणे बाहेर होताना दिसून येत आहे. ठाकरेंच्या मशाल चिन्हावर पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील नऊपैकी एकाही मतदारसंघात उमेदवार असण्याची शक्यता आता जवळपास संपल्यात जमा आहे. गतवेळी ठाकरे यांच्या धनुष्य-बाण चिन्हावर कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, शिरुर या मतदारसंघांत उमेदवार उभे होते. यंदा यापैकी कुठेही त्यांचे मशाल चिन्ह नसणार आहे. (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) group is seen to be completely out of West Maharashtra in the Lok Sabha elections.)

पश्चिम महाराष्ट्र हा भाग पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, सातारा आणि कोल्हापूरची राजघराणे अशा नेत्यांनी निवडणुकीच्या राजकारणात काँग्रेस रुजवली आणि वाढवली देखील. नंतरच्या काळात शरद पवार, शंकरराव पाटील, शंकरराव मोहिते पाटील यांनी या वाढीला मोठा हातभार लावला. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर त्यांच्या पक्षाने काँग्रेसची जागा घेतली. भाजप-शिवसेनेची युती भागात निवडणूक लढवित होती. मात्र 2014 मध्ये मोदी लाटेत भाजप-शिवसेनेने पश्चिम महाराष्ट्रात ताकदीने शिरकाव केला.

Monika Rajale यांच्या मतदार संघात कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा; गुन्हेगारी विरोधात नागरिकांचा मोर्चा

कोल्हापूर, सातारा, शिरुर हे मतदारसंघ शिवसेनेने, सांगली, सोलापूर, पुणे हे मतदारसंघ भाजपने आणि हातकणंगले, माढा स्वाभिमानी शेतकरी संघटना, बारामती रासप या मित्रपक्षांनी लढविले. यात शिरुरचा बालेकिल्ला हा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 2004 मध्येच शिवसेनेकडे आणला होता. तो त्यांनी कायम ठेवला. तर सांगलीमध्ये भाजपने संजय पाटील यांच्यारुपाने पहिल्यांदाच विजय मिळविला. पुणे आणि सोलापूरमध्येही भाजपला यश मिळाले. हातकणंगलेत राजू शेट्टी यांनी विजय संपादन केला. याशिवाय माढा आणि बारामतीमध्ये मित्रपक्षांनी आव्हानात्मक लढत दिली. 2019 ला कोल्हापूर, हातकणंगलेत शिवसेनेने पहिल्यांदाच भगवा फडकवला. सांगली, पुणे, सोलापूर हे मतदारसंघ भाजपने कायम राखले. तर माढा खेचून आणला.

आता मात्र महाविकास आघाडीमध्ये असताना ठाकरे यांच्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात एकही मतदारसंघ राहिलेला नाही. सगळ्यात आधी ताकद वाढल्याचे म्हणत सतेज पाटील यांनी कोल्हापूर मतदारसंघ काँग्रेसकडे घेतला. शाहू महाराज छत्रपती यांच्यारुपाने इथे उमेदवारही ताकदीचा दिला. महाराजांना विरोध करायचा ठाकरेंचा प्रश्नच नव्हता. तर सातारा, शिरुर, बारामती, माढा हे शरद पवारांनी आपल्याकडे कायम ठेवले. पुणे आणि सोलापूर हे परंपरेचे मतदारसंघ असल्याचे म्हणत काँग्रेसने स्वतःकडेच ठेवले. प्रश्न हातकणंगले आणि सांगलीचा होता. यात हातणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्यामुळे सांगली आपल्याला मिळावा असा दावा ठाकरेंचा होता.

श्रीरंग बारणे अन् संजोग वाघेरे येणार आमने-सामने; मावळच्या प्रश्नांवर होणार ‘फाईट’

ठाकरेंनी त्यानुसार पै. चंद्रहार पाटील यांचा प्रवेश घडवून आणत त्यांच्या उमेदवारीचीही घोषणा केली. मात्र विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी अखेरपर्यंत प्रयत्न करत हा मतदारसंघ काँग्रेसकडे रहावा यासाठी प्रयत्न केले. अगदी दिल्लीपर्यंत धडक मारली. सांगली काँग्रेसकडेच राहिल यासाठी ठाकरेंना जालना मतदारसंघाचा पर्याय देण्यात आला. तिथे काँग्रेसचे सरचिटणीस संजय लाखे पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश घडवून आणला. मात्र ठाकरे आपला हट्ट सोडायला तयार नव्हते. अशात आता ठाकरेंचे संभाव्य उमेदवार चंद्रहार पाटील यांनीच माघार घेण्याची तयारी दर्शविली आहे. विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना पाठिंबा देऊ, महाविकास आघाडी जो निर्णय घेईल त्यास बांधील राहू असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हे संपूर्ण घमासान पार पडल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे चित्र काहीसे असे असणार आहे… 

कोल्हापूर – शाहू महाराज, काँग्रेस

हातकणंगले – राजू शेट्टी, महाविकास आघाडी

सांगली – विशाल पाटील, काँग्रेस

सातारा – श्रीनिवास पाटील, सारंग पाटील किंवा बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)

पुणे – रवींद्र धंगेकर, काँग्रेस

शिरुर –  अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)

बारामती – सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)

सोलापूर – प्रणिती शिंदे, काँग्रेस

माढा – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)

कोकणात मात्र ठाकरेंचा दबदबा.. :

एका बाजूला पश्चिम महाराष्ट्रात ठाकरेंना बाहेर पडावे लागले असले तरी दुसऱ्या बाजूला कोकणातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बाहेर पडावे लागले आहे. कोकण पट्ट्यातील मुंबईतील दोन आणि भिवंडी हे तीन मतदारसंघ वगळता सर्व मतदारसंघात म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे, कल्याण आणि मुंबईतील चार मतदारसंघांत ठाकरेंचे उमेदवार असणार आहेत. रायगड मतदारसंघात गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे निवडून आले होते. मात्र ते आता अजित पवार यांच्यासोबत गेल्याने शरद पवार यांच्याकडे इथे तुल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे त्यांनी हा मतदारसंघ ठाकरेंसाठी सोडला आहे.

follow us