श्रीरंग बारणे अन् संजोग वाघेरे येणार आमने-सामने; मावळच्या प्रश्नांवर होणार ‘फाईट’
पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे (Srirang Barane) आणि महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार संजोग वाघेरे (Sanjog Waghere) हे दोघेही आमने-सामने येणार आहेत. येत्या रविवारी (24 मार्च) रोजी ‘दिशा फाऊंडेशन’च्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लोकसभेचा रणसंग्राम – मावळ लोकसभा’ या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात रविवारी सायंकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी मतदारसंघातील विविध प्रश्न तथा समस्यांवर आधारित सविस्तर चर्चा होणार आहे. (Srirang Barane, the probable candidate of Mahayutti, and Sanjog Waghere, the probable candidate of Mahavikas Aghadi, are both going to face each other.)
आयोजक दिशा फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, मावळचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे संभाव्य उमेदवार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीचे मावळचे संभाव्य उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासह पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे, भाजपचे पिंपरी शहराध्यक्ष शंकर जगताप, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार), प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर हे या कार्यक्रमातील चर्चेत सहभागी होणार आहेत. लेट्सअप मराठीचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार योगेश कुटे हे या कार्यक्रमाचे सूत्रसंवादक असणार आहेत.
जाहीरनामा कसा होतो तयार, निवडणूक आयोगाचे नियम काय? जाणून घ्या, A टू Z माहिती
मावळ लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुचर्चित मतदारसंघ मानला जातो. येथील विविध मुद्द्यांचा राजकीय अंगाने परामर्ष घेण्यासाठी ‘लोकसभेचा रणसंग्राम – मावळ लोकसभा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मतदारसंघातील विविध प्रश्न तथा समस्यांवर आधारित सविस्तर चर्चा होणार आहे. सदर कार्यक्रमासाठी सर्वांना प्रवेश असून काही जागा राखीव असणार आहेत, अशी माहितीही आयोजकांनी दिली आहे.
अखेर मनसेचंही ठरलं! शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर मैदानात उतरणार…
दोन्ही उमेदवारांकडून विजयाचा दावा :
श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. महायुतीमध्ये आपल्याचा तिकीट मिळेल, असा त्यांचा दावा आहे. पाच वर्षांच्या कामाच्या जोरावर मतदार पुन्हा आपल्यालाच संधी देतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा, अजित पवार यांची साथ यामुळे विजय आपलाच होणार असा विश्वास ते व्यक्त करीत आहेत. दुसऱ्या बाजूला संजोग वाघेरे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दिवंगत महापौर भिकनशेठ वाघेरे-पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या कुटुंबाला मोठा राजकीय वारसा आहे. वाघेरे हे पिंपरीगावातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते महापौरही राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक निवडणुक लढल्या गेल्या आहेत. त्यांच्या पत्नी उषा वाघेरे याही माजी नगरसेविका आहेत.