जागतिक तणाव, तेल बाजारात अस्थिरता; भारतात मात्र इंधन पुरवठा सामान्य असल्याचा सरकारचा दावा
भारत सरकारने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, सेष्ट सध्या तेल किंवा गॅसची कोणतीही टंचाई नाही आणि इंधन पुरवठा सुरळीत सुरू आहे.
Global tensions, volatility in oil markets : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर तेल संकटाच्या शक्यता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. विशेषतः आखाती देशांत वाढत चाललेला संघर्ष आणि त्याचा जागतिक ऊर्जा बाजारावर होणार परिणाम लक्षात घेता अनेक देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र भारत सरकारने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, देशात सध्या तेल किंवा गॅसची कोणतीही टंचाई नाही आणि इंधन पुरवठा सुरळीत सुरू आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी गुरुवारी संसदेत यासंदर्भात माहिती देताना सांगितले की देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. त्यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर आणि काही ठिकाणी पसरलेल्या अफवांमुळे लोकांमध्ये अनावश्यक भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या भीतीमुळे अनेकांनी मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर बुकिंग करण्यास सुरूवात केली, त्यामुळे अचानक मागणी वाढल्याचे दिसून आले.
मात्र सरकारने परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण असल्याचे सांगितले आहे. मंत्री पुरी यांनी स्पष्ट केले की, देशातील सर्व रिफायनाऱ्या सध्या पूर्ण क्षमतेने, म्हणजेच 100 टक्के उत्पादन क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यांनी पुढे सांगितले की कमर्शियल एलपीजी सिलेंडरचा पुरवठा आजपासून पुन्हा नियमितपणे सुरू केला जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना 45 दिवसांच्या आत दुसऱ्या सिलेंडरची बुकिंग करण्याची सुविधा देण्यात येणार आहे, ज्यामुळे ग्रामीण भागात देखील कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.
दरम्यान देशातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशननेही नागरिकांना आश्वस्त केले आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, देशभरातील सर्व फ्युल स्टेशन नेहमीप्रमाणे सुरू आहेत आणि पेट्रोल-डिझेलचा पुरवठा अखंडपणे सुरू आहे. कंपनीच्या मते देशातील वितरण व्यवस्था मजबूत असून नागरिकांना इंधनाच्या उपलब्धतेबाबत कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. इंडियन ऑईलने लोकांना आवाहन केले आहे की, त्यांनी केवळ अधिकृत आणि विश्वासार्ह माहितीवरच विश्वास ठेवावा आणि सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांपासून दूर राहावे.
अजितदादांच्या विमान अपघातावरून दिल्ली दरबारात खळबळ; रोहित पवार यांची राहुल गांधींसोबत अर्धा तास चर्चा
भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने पाहिले तर देश मोठ्या प्रमाणावर आयातीत कच्च्या तेलावर अवलंबून आहे. भारत आपल्या एकूण तेल गरजांपैकी सुमारे ८० टक्के तेल परदेशातून आयात करतो. त्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात जर कोणतीही अस्थिरता निर्माण झाली, तर त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता असते. तेलाच्या किंमती वाढल्यास वाहतूक खर्च, औद्योगिक उत्पादन खर्च आणि सर्वसामान्यांच्या जीवनमानावर त्याचा परिणाम दिसू शकतो.
दरम्यान जागतिक स्तरावर तेलाचा पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी काही महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. अमेरिकेने आपल्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हमधून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल बाजारात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत सुमारे 172 दशलक्ष बॅरल कच्चे तेल उपलब्ध करून देण्यात आले आहे, ज्यामुळे जागतिक बाजारात पुरवठा वाढेल आणि किंमती स्थिर ठेवण्यास मदत होईल.
याचबरोबर इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी अर्थात IEA ने देखील आपल्या सदस्य देशांसह एकत्रितपणे आपत्कालीन साठ्यातील तेल बाजाराचे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सुमारे 400 दशलक्ष बॅरल तेल जागतिक बाजारात उपलब्द्ध करून देण्यात येणार आहे. ऊर्जा तज्ज्ञांच्या मते 1973 मधील ऐतिहासिक 1973 ऑइल क्रायसीस नंतर सहाव्यांदा IEA ने जागतिक तेल पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी अशा प्रकारचा मोठा निर्णय घेतला आहे.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाची सुरूवात 28 मार्च रोजी झाली, तेव्हा इस्राईलने इराणवर हवाई हल्ले केल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर या संघर्षाची तीव्रता वाढत गेली आणि आता या तणावाला जवळपास दोन आठवडे उलटले आहेत. या परिस्थितीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे, कारण आखाती भाग हा जगातील सर्वात महत्वाचा तेल उत्पादक प्रदेश मनाला जातो.
ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मत आहे की, हा संघर्ष जर दीर्घकाळ चालू राहिला, तर जागतिक तेल पुरवठ्यावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. त्यामुळे सध्या जगभरातील सरकारे आणि ऊर्जा संस्था परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. एकूणच पाहता, सध्याच्या घडीला भारतात तेल आणि गॅसचा पुरवठा सुरळीत असून नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. सरकार आणि तेल कंपन्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवशयक ते सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
