आंदोलनावेळी पोलीस AK-47 वापरू शकतात का?; कायदा काय सांगतो, SOP मध्ये काय?

AK-47 बिहारमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी AK-47 रायफलचा वापर केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

  • Written By: Published:
When Can Police Use An AK-47

When Can Police Use An AK-47 During Protest : बिहारमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी AK-47 रायफलचा वापर केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. या आरोपानंतर देशभरात एकच चर्चा सुरू झाली आहे. आंदोलने किंवा जमाव नियंत्रणासाठी पोलिसांना खरोखरच AK-47 सारखी स्वयंचलित रायफल वापरण्याची परवानगी असते का? भारतातील कायदा आणि पोलिसांची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (SOP) याबाबत नेमकं काय सांगते, ते जाणून घेऊया.

आंदोलन नियंत्रणासाठी AK-47 वापरता येते का?

आंदोलन नियंत्रणासाठी AK-47 वापरता येते का? तर, सामान्य परिस्थितीत याचे उत्तर नाही असे आहे. भारतात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी किंवा आंदोलन, मोर्चा अथवा जमाव नियंत्रणासाठी पोलिसांना AK-47 सारख्या ऑटोमॅटिक रायफलचा वापर करण्याची परवानगी नसते. AK-47 चा वापर केवळ काही अत्यंत गंभीर परिस्थितींमध्येच केला जातो. जसे की, दहशतवादविरोधी कारवाई, नक्षलविरोधी मोहिमा, शस्त्रांनी सज्ज गुन्हेगारांशी चकमक तसेच जीवाला गंभीर धोका निर्माण झाल्यास आत्मसंरक्षण यासारख्या विशेष परिस्थितीतच AK-47 वापरण्यास परवानगी आहे.

जमाव नियंत्रणासाठी भारतात कोणती SOP?

गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (BPR&D) यांच्या शिफारसी आणि लागू कायदेशीर तरतुदींनुसार जमाव नियंत्रणासाठी कमीत कमी आवश्यक बळाचा वापर करणे स्वीकारले जाते. परिस्थिती बिघडत गेली तरच पुढचा टप्पा वापरला जातो. पहिला टप्प्यात जमावाला समजावून सांगितले जाते. यात सर्वप्रथम पोलीस आंदोलकांशी संवाद साधतात. लाऊडस्पीकरद्वारे सूचना दिल्या जातात आणि शांततेने जागा रिकामी करण्याचे आवाहन केले जाते. त्यानंतर दुसरा जमाव हटत नसेल, तर वॉटर कॅननचा वापर करून गर्दी मागे ढकलण्याचा प्रयत्न केला जातो. यात गंभीर दुखापत होऊ नये, याची काळजी घेतली जाते. त्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात आली नाही, तर अश्रुधूराचे गोळे किंवा मिरचीवर आधारित गर्दी नियंत्रण साधनांचा वापर केला जाऊ शकतो.

परिस्थिती अधिक चिघळल्यास मर्यादित स्वरूपात लाठीचार्ज केला जाऊ शकतो. यासाठी सामान्यतः कार्यकारी दंडाधिकाऱ्याची (Executive Magistrate) परवानगी आवश्यक असते.अत्यावश्यक परिस्थितीत रबर बुलेट किंवा पॅलेट गन वापरण्याची परवानगी दिली जाऊ शकते. यामध्ये शक्यतो पायांवर लक्ष्य ठेवण्याच्या सूचना असतात, जेणेकरून जीवितहानी टाळता येईल. वरील सर्व पर्यायांचा वापर करूनही  परिस्थिती नियंत्रणात येत नसेल आणि जमाव अत्यंत हिंसक झाल्यास, नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाल्यास किंवा मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असेल, तरच अंतिम पर्याय म्हणून  गोळीबार केला जाऊ शकतो. मात्र, यासाठीही कार्यकारी दंडाधिकाऱ्याचा लेखी आदेश आवश्यक असतो. गोळीबार करतानाही शक्यतो शरीराच्या खालच्या भागावर लक्ष्य ठेवण्याच्या सूचना दिल्या जातात.

AK-47 कोण वापरू शकतात?

गृह मंत्रालयाच्या नियमांनुसार AK-47 हे प्लाटून-स्तरीय शस्त्र मानले जाते. सामान्य पोलिस अधिकारी ते नियमित गस्तीदरम्यान बाळगत नाहीत. हे शस्त्र प्रामुख्याने स्पेशल टास्क फोर्स (STF), अँटी टेरर स्क्वॉड (ATS), नक्षलग्रस्त भागातील विशेष सुरक्षा पथके आणि विशेष प्रशिक्षण घेतलेले जवान यांनाच दिले जाते.

पोलिसांकडून कितीवेळा गोळीबार?

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या आकडेवारीनुसार, हिंसक जमावांना हाताळताना भारतीय पोलीस दरवर्षी अंदाजे 200 ते 300 वेळा जिवंत दारुगोळ्याचा वापर करतात. देशभरात दरवर्षी अंदाजे 40,000 ते 50,000 दंगलीच्या घटनांची नोंद होते. यापैकी 0.5% पेक्षा कमी प्रकरणांमध्ये पोलीस जिवंत दारुगोळ्याचा वापर करतात. बहुतेक घटना वाटाघाटी, पाण्याचे फवारे, अश्रुधूर किंवा लाठीचार्जद्वारे सोडवल्या जातात.

follow us