Video : आता मला आठवा रेकॉर्ड करायचाय; गडकरींनी सर्वांसमोर सांगितलं पुढचं टार्गेट…

Nitin Gadkari On Mumbai Goa Highway Inauguration मुंबई-गोवा महामार्ग व्हायला उशीर झाला, ही माझ्यादृष्टीने दुर्दैवाची गोष्ट

  • Ninad K
  • Written By: Published:
Nitin Gadkari

Nitin Gadkari On Mumbai Goa Highway Inauguration : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी दरवर्षी डोकेदुखी ठरणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता स्पष्ट शब्दांत खेद व्यक्त केला आहे. मुंबई-गोवा महामार्ग व्हायला उशीर झाला, ही माझ्यादृष्टीने दुर्दैवाची गोष्ट असून येणाऱ्या काळात मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला मी येणार नाही. मला लाज वाटते की इतका उशीर झाला आहे, अशी खंत गडकरींनी व्यक्त केली. ते गोव्यातील पोरवोरिम येथील सहापदरी उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.

आता मला आठवा रेकॉर्ड करायचा

महामार्गाचे काम तब्बल १५ वर्षांहून अधिक काळ रखडले असून, अद्यापही काही पूल आणि बाह्यवळण मार्गांची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवातही कोकणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. महामार्गाच्या कामात अनेक कंत्राटदार अपयशी ठरल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात अनेक कंत्राटदार अपयशी ठरले आहेत. आता मला आठवा रेकॉर्ड करायचा आहे, तो म्हणजे वर्षभरात जास्तीत जास्त कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करणे आणि अधिकाऱ्यांना निलंबित करणे, असा इशाराही त्यांनी दिला.

महामार्ग ९३-९४ टक्के पूर्ण झाल्याचा दावा

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी नुकतीच बैठक झाल्याचे गडकरी यांनी सांगितले. “कालच बैठक झाली असून मुंबई-गोवा महामार्ग ९३-९४ टक्के पूर्ण झाला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. ऑक्टोबरमध्ये स्वतः या महामार्गाची पाहणी करण्याचा त्यांचा मानस आहे. “ऑक्टोबर महिन्यात मुंबई विमानतळावर उतरून गाडीने मुंबई-गोवा महामार्गाने गोव्याला येणार आहे. महामार्ग व्यवस्थित झाला आहे की नाही, हे स्वतः पाहणार आहे,” असे गडकरी यांनी सांगितले.

सरकारकडून महामार्गाचे काम ९० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात महत्त्वाची कामे अद्याप बाकी आहेत. इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण मार्गांची कामे रखडली आहेत. चिपळूणमधील उड्डाणपुलाचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. नागोठणे येथील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला तडे गेल्याने हा पूल सध्या वाहतुकीसाठी बंद आहे. पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून हलक्या वाहनांसाठी किमान एक मार्गिका सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र संरचना आणि सक्षमता चाचणी झाल्यानंतरच पुलावर वाहतूक सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

२०११ पासून सुरू असलेला प्रवास अजूनही अपूर्ण

मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाला २०११ मध्ये सुरुवात झाली. त्यानंतर इंदापूर ते झाराप या दुसऱ्या टप्प्यातील कामाला २०१४ मध्ये सुरुवात झाली. दोन्ही टप्प्यांची कामे साधारण दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र भूसंपादनातील अडथळे, पर्यावरणविषयक मंजुरी, कंत्राटदारांची निष्क्रियता आणि अन्य प्रशासकीय कारणांमुळे कामाचा कालावधी वारंवार वाढत गेला. १५ वर्षांहून अधिक काळ उलटूनही महामार्ग पूर्णत्वास गेलेला नसल्याने आता गडकरींच्या ‘खेद’ व्यक्त करण्याच्या वक्तव्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

follow us