MHT-CET Scam : 12 वीला 40 टक्के अन् CET परिक्षेत 99 पर्सेंटाईल कसे…MHT-CET परीक्षेतही घोटाळा?
नीट, एमपीएससीनंतर आता MHT CET परीक्षेतही घोटाळा झाला असल्याची माहिती समोर येत आहे, या प्रकारावर सीईटी सेलने स्पष्टीकरण दिलंय.
MHT-CET CELL Exam : देशभरात नीटच्या मुद्द्यावरुन वादंग पेटलेलं असतानाच दुसरीकडे एमपीएससी औषध निरीक्षक पदाच्या भरतीत गैरप्रकार केल्याचा आरोप केला जात आहे. अशातच आता आणखी एक नवा गैरप्रकार समोर येत आहे. राज्यात महाविद्यालयीन प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या MHT-CET परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला जात आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमधून 12 वीत विद्यार्थ्याला 40 टक्के तर MHT-CET परीक्षेत 99 पर्सेंटाईल कसे? असा थेट सवाल एका शिक्षकाने केला जात आहे. राष्ट्रवादीचे महादेव बालगुडे यांनी एका शिक्षकाचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया एक्स हँडलवरून शेअर केला आहे. त्यामुळे आता नीटनंतर एमपीएससी आणि आता MHT-CET परीक्षाही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
या व्हिडिओमध्ये MHT-CET परिक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप होत असून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी घेतलेल्या विद्यार्थ्यांना MHT-CET परीक्षेत 99 पर्सेंटाईल मिळाले आहेत. टॉपर 136 विद्यार्थ्यांना 12 वी ला 40 ते 60 टक्के गुण मिळालेले आहेत. त्यानंतर MHT-CET परीक्षेत 99 पर्सेंटाईल कसे मिळाले? हे गुण गैरप्रकार करुन मिळवल्याचा आरोप केला जात आहे. या संपूर्ण आरोपानंतर CET सेलने आरोप फेटाळून लावले असून या प्रकाराची सत्यता तपासण्यासाठी सीईटकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत प्रकाराची सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात MHT CET परीक्षेत मोठा घोटाळा झाला असल्याचा दावा केला जात आहे. या परीक्षेत पैशांनी निकाल विकत घेतले आहेत. व्हिडिओमध्ये माहिती सांगणाऱ्या शिक्षकाने मी पुराव्यानिशी बोलत असल्याचा दावा केला आहे. 10 वी 12 वीत ज्यांना चांगले मार्क नाहीत त्यांना सीईटी परीक्षेत 99 पर्सेंटाईल कसे असा थेट सवाल या शिक्षकाने केला आहे.
आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही….
सोशल मीडियावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असं म्हणत CET सेलचे आयुक्त सरदेसाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. काही विद्यार्थी बोर्डापेक्षा सीईटीला जास्त प्राधान्य देतात, त्यामुळे त्यांना सीईटी परीक्षेत जास्त गुण असतात. दोन परीक्षांमध्ये तुलना करण चुकीचं आहे. टक्के आणि पर्सेंटाईल यांची तुलना चुकीची असल्याचं सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितलं. सध्या आलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने अंतर्गत विश्लेषण करण्यात येणार आहे, त्यानंतरच आम्ही पुढील निर्णय घेऊ, असंही त्यांनी नमूद केलं.
एका परीक्षेत असलेल्या परफॉर्मन्सप्रमाणे दुसऱ्या परीक्षेतही तसाच परफॉर्मन्स दिला पाहिजे ही अपेक्षा काही योग्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पर्सेंटाइल आणि पर्सेंटेज या दोन्ही पद्धती वेगळ्या आहेत. पर्सेंटाइल पद्धती ही त्या त्या बॅचसाठी असते, त्यामध्ये जो टॉपर असतो, त्याला 100 पर्सेंटाइल म्हणतात. त्या रॉ स्कोअर 70, 80ल किंवा 90 टक्के, कितीही असू शकतो. पण तो त्या बॅचमध्ये टॉपर असल्यामुळे त्याला 100 पर्सेंटाइल म्हणतात. याचा अर्थ असा नव्हे की 100 टक्के मार्क मिळालेत, असं आयुक्त सरदेसाई म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात सध्या पेपरफुटीच्या प्रकरणांवरुन आधीच वादंग सुरु आहे. त्यानंतर आता आणखी एका परीक्षा घोटाळ्याची भर पडत आहे. नीटच्या मुद्द्यावरुन विद्यार्थ्यांनी छेडलेलं आंदोलन शांत होत नाही, तोवरच एमपीएससी आणि आता MHT CET परीक्षेत गैरप्रकार होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्यांमधून या प्रकाराची निष्पक्ष चौकशी केली जावी, अशी मागणी केली जात आहे.