पुण्यात तब्बल ९२ हजार कोटींची घरे विक्रीविना पडून; बांधकाम व्यवसायिकांना घाम फोडणारा रिपोर्ट

Home In Pune पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्राबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात अंजजन घालणारी बातमी

  • Written By: Published:
Pune Gera Developer Report

Homes worth Rs. 92,000 crore remain unsold in Pune Gera Developer Report : पुण्यात स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न अनेकांचं असलं, तरी दुसरीकडे शहरात तब्बल ९२,११० कोटी किमतीची घरे विक्रीविना पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. घरांची विक्री वाढत असली, तरी त्यापेक्षा जास्त वेगाने नवीन प्रकल्प बाजारात येत असल्याने हा साठा विक्रमी पातळीवर पोहोचल्याचे प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनी ‘गेरा डेव्हलपमेंट्स’ यांनी त्यांच्या ताज्या ‘पुणे रेसिडेन्शियल रियल्टी अहवालात’ (जुलै २०२६) हे धक्कादायक आकडे जाहीर केले आहेत. पुणे, गोवा, बेंगळुरू आणि कॅलिफोर्नियामध्ये कार्यरत असलेल्या गेरा डेव्हलपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडने (GDPL) प्रकाशित केलेल्या या अहवालानुसार, पुण्यातील २,९०० हून अधिक प्रकल्प आणि ३.४ लाखांहून अधिक निर्माणाधीन घरांचा अभ्यास करण्यात आला आहे.

अहवालात नेमकं काय?

अहवालानुसार, जून २०२६ अखेरच्या १२ महिन्यांत पुण्यात ९२,३४१ घरांची विक्री झाली, जी मागील वर्षाच्या तुलनेत ७ टक्क्यांनी अधिक आहे. सलग तीन वर्षांच्या मंदीनंतर प्रथमच घरविक्रीत वाढ झाली आहे. मात्र, याच कालावधीत १,०१,०८५ नवीन घरांचे प्रकल्प बाजारात आले, म्हणजेच विक्रीपेक्षा पुरवठा अधिक राहिला. त्यामुळे न विकल्या गेलेल्या घरांच्या साठ्याचे मूल्य २८ टक्क्यांनी वाढून ९२,११० कोटींवर पोहोचले आहे. यामुळे बाजारातील इन्व्हेंटरी ओव्हरहँग म्हणजे उपलब्ध घरे विकण्यासाठी लागणारा कालावधीही १०.८ महिन्यांवरून ११.३ महिन्यांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच सध्याच्या विक्रीच्या वेगाने हा साठा संपवण्यासाठी जवळपास वर्षभर लागेल.

सर्वसामान्यांसाठी अहवालातील महत्त्वाचे मुद्दे कोणते?

घरांची विक्री वाढली : जून २०२६ मध्ये संपलेल्या १२ महिन्यांत पुण्यात एकूण ९२,३४१ घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षी हा आकडा ८६,६६६ होता. सलग तीन वर्षे घसरण झाल्यानंतर झालेली ही पहिली वाढ आहे.

– पगार वाढल्याने घर घेणे थोडे सोपे : गेल्या ५ वर्षांत पहिल्यांदाच असे घडले आहे की, नोकरदारांचे वेतन सुमारे ५.९% हे घरांच्या किमती वाढण्याच्या दरापेक्षा ४.८% अधिक वेगाने वाढले आहे. यामुळे ‘अॅफोर्डेबिलिटी इंडेक्स’ सुधारून ३.९४ वर आली आहे जी गेल्या वर्षी ३.९८ होती.

– किमती वाढण्याचा वेग मंदावला : शहरात घरांचा सरासरी दर प्रति चौरस फूट ७,०८२ झाला असून, किमती वाढण्याचा वेग मागील वर्षातील ७.३% वरून आता ४.८% वर आला आहे.

– रेडी-पोझिशन घरांचा मोठा तुटवडा : बाजारात एकूण ९२ हजार कोटींची घरे पडून असली, तरी तातडीने राहण्यासाठी तयार असलेली घरे मात्र अतिशय तुटपुंजी म्हणजेच अवघी २,०६५ युनिट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे रेडी पझेशन घेणाऱ्यांना अजूनही संघर्ष करावा लागत आहे. न विकल्या गेलेल्या ८६,९५४ घरांपैकी केवळ २,०६५ घरेच तात्काळ ताब्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे लगेच राहायला जाण्याची इच्छा असलेल्या खरेदीदारांसाठी पर्याय अजूनही मर्यादित आहेत.

१ BHKची संख्या कमी, ३ BHKचा दबदबा

६०० ते ८०० चौरस फुटांच्या लहान घरांच्या (1 BHK) मागणीत सलग सातव्या वर्षी घट १९% घट झाली आहे. याउलट, १,४०० ते १,६०० चौ. फुटांपर्यंतच्या मोठ्या घरांच्या म्हणजेच 3 BHK आणि त्याहून मोठ्या घरांच्या मागणीत तब्बल ३३% वाढ झाली आहे. अहवालानुसार, नवीन प्रकल्पांमध्ये आता ३ BHK घरांचा वाटा ३३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर १-BHK घरांचे प्रमाण केवळ १० टक्के राहिले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच घर घेणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी पर्याय कमी होत असल्याचे चित्र आहे.

कोणत्या भागात सर्वाधिक प्रकल्प?

अहवालानुसार, पीसीएमसी (झोन-६) आणि पश्चिम पुणे-आयटी कॉरिडॉर (झोन-४) या दोन भागांत शहरातील ६० टक्क्यांहून अधिक नवीन प्रकल्प उभारले जात आहेत. पश्चिम पुण्यात घरांचे सरासरी दर ८,५९२ प्रति चौरस फूट आहेत, तर पीसीएमसीमध्ये ५,७७३ प्रति चौरस फूट दर असल्याने तो भाग तुलनेने अधिक परवडणारा मानला जात आहे.

रोहित गेरा यांचा इशारा

गेरा डेव्हलपमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा यांनी सांगितले की, तीन वर्षांच्या मंदीनंतर घरविक्रीत सुधारणा दिसत असली, तरी डेव्हलपर्सनी नवीन प्रकल्प सुरू करताना संयम बाळगणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, नवीन प्रकल्पांची संख्या विक्रीपेक्षा जास्त असल्यामुळेच ९२,११० कोटींचा न विकलेला साठा तयार झाला आहे. हा साठा आणखी वाढला तर डेव्हलपर्सच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होण्याबरोबरच प्रकल्प पूर्ण होण्यासही विलंब होऊ शकतो. त्यांनी असेही सांगितले की, बांधकाम साहित्य आणि मजुरीचा खर्च अजूनही वाढलेला असल्याने भविष्यात घरांच्या किमतीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, ज्या विभागात घरांचा साठा अधिक आहे, त्या ठिकाणी सध्या खरेदीदारांसाठी चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

पश्चिम आशियातील युद्धामुळे खनिज तेलाच्या किमतीचा उडालेला भडका आणि बांधकामासाठीच्या कच्च्या मालाची महागाई यामुळे बांधकाम खर्चात मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत घरांच्या किमतीतील वाढ मंदावल्याने विकासकांसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. विक्री कमी होण्याचा धोका  असल्याने किमतीत वाढ करणे विकासकांना शक्य होत नसल्याचे चित्र आहे. यातून विकासकांचा नफा कमी होऊ लागला आहे.

पुढे काय?

गेराच्या अंदाजानुसार, २०२६ च्या उत्तरार्धात पुण्यात दरवर्षी ९२ ते ९५ हजार घरांची विक्री होण्याची शक्यता आहे. किमतीतील वाढ ५ ते ६ टक्क्यांच्या मर्यादेत राहू शकते. मात्र, जर डेव्हलपर्सनी नवीन प्रकल्पांचा वेग कमी केला नाही, तर ही आकडेवारी वाढू शकते. तसेच विक्री न झालेल्या घरांमध्ये आलिशान घरांचे प्रमाण अधिक असून, त्यांची विक्री होण्यास पुढील १३.५ महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

एकूणच, पुण्याचा गृहबाजार सध्या दोन वेगवेगळे चित्र दाखवत आहे. एकीकडे घरविक्रीत सुधारणा होत आहे, तर दुसरीकडे विक्रीपेक्षा जास्त घरे बाजारात येत असल्याने ९२ हजार कोटींची घरे अजूनही ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पुढील काळात डेव्हलपर्स किती संयमाने नवीन प्रकल्प आणतात, यावरच पुण्याच्या रिअल इस्टेट बाजाराची दिशा ठरणार आहे.

follow us

संबंधित बातम्या