मावळात बारणेंविरोधातील उमेदवार ठरला? अजितदादा समर्थक संजोग वाघेरेंचा ठाकरे गटात प्रवेश
मुंबई : पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीमध्ये ‘मातोश्री’ बंगल्यावर शिवबंधन बांधून पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्य प्रवक्ते संजय राऊत, आमदार सचिन अहिर, पिंपरी चिंचवडमधील ज्येष्ठ कामगार नेते एकनाथ पवार (Eknath Pawar) उपस्थित होते. वाघेरे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत मावळमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. (Former mayor of Pimpri-Chinchwad and former NCP city president Sanjog Waghere joined Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray)
संजोग वाघेरे हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक मानले जात होते. तर वाघेरे यांचे वडीलही राष्ट्रवादीमध्येच होते. त्यांनी शरद पवारांना खंबीर साथ दिली. पवार घराण्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे. पण राष्ट्रवादीत असताना वाघेरे यांनी दोन वेळा लोकसभा निवडणुकीची तयारीही करुनही उमेदवारी मिळाली नव्हती. त्यामुळे यंदा त्यांनी ठाकरे यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली होती. त्यावर ठाकरेंनी दोन दिवसांचा वेळ मागितला होता. त्यानंतर आता ते थेट ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.
पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे ह्यांच्यासह मातोश्रीवर उपस्थित असलेल्या शिवसैनिकांशी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी साधलेला संवाद! pic.twitter.com/QIpGAEhLWa
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 30, 2023
समोर आप्पा बारणे असो की पार्थ पवार, चितपट करणारच!
नुकताच लेट्सअप मराठीने वाघेरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले होते की, मी ज्या पक्षात राहिलो. त्या ठिकाणी मी एकनिष्ठ राहिलो आहे. उद्धव ठाकरेंचे विचार आणि त्यांचे काम पाहिले. त्यामुळे मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी माझ्यावरती लोकसभा निवडणुकीची जबाबदारी दिल्यास मी कोणताही उमेदवार समोर असल्यास माझे काम करणारच. मग समोर शिवसेनेचे श्रीरंग बारणे असोत की अजित पवार गटाचे पार्थ पवार असोत, असे म्हणत एक प्रकारे समोर असणाऱ्या शिवसेना (एकनाथ शिंदे गट) किंवा अजित पवार गटाविरुद्ध लढण्याचा इशारा दिला आहे.