कुणी कुणाची शाळा घेतली? सचिन, धोनी आणि गंभीरबद्दलचे ‘ते’ गुपित अखेर उघड

Indian Cricket Team : भारतीय क्रिकेट विश्वात गेल्या दशकभरात अनेक वाद गाजले, पण निवड समितीच्या बंद दाराआड नक्की काय घडलं? हे गुपित

Indian Cricket Team

Indian Cricket Team : भारतीय क्रिकेट विश्वात गेल्या दशकभरात अनेक वाद गाजले, पण निवड समितीच्या बंद दाराआड नक्की काय घडलं? हे गुपित अखेर माजी मुख्य निवडकर्ते संदीप पाटील यांनी उघड केलं आहे. विकी लालवानी यांच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी एमएस धोनी, सचिन तेंडुलकर आणि गौतम गंभीर यांच्याशी संबंधित अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या ऐकून क्रिकेट चाहतेही अवाक झाले आहेत.

धोनी आणि युवराज : योगराज सिंग यांच्या आरोपांमागचं सत्य

युवराज सिंगला (Yuvraj Singh) संघातून काढण्यामागे एमएस धोनीचा (MS Dhoni) हात असल्याचा दावा त्याचे वडील योगराज सिंग वर्षानुवर्षे करत आले आहेत. मात्र, संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी हा दावा पूर्णपणे खोडून काढला आहे. ते म्हणाले, मी रेकॉर्डवर सांगतो की, निवड समितीच्या कोणत्याही बैठकीत, दौऱ्यावर किंवा सामन्यादरम्यान धोनीने एकदाही ‘युवराजला संघातून काढा’ असं म्हटलं नाही. उलट, निवड समिती जो निर्णय घेईल, त्यावर धोनीचा पूर्ण विश्वास असायचा. योगराज सिंग यांचं पुत्राबद्दलचं प्रेम मी समजू शकतो, पण त्यांनी चुकीच्या व्यक्तीवर निशाणा साधला आहे.

सचिन तेंडुलकरचा ‘तो’ धक्का आणि निवृत्तीची चर्चा

2012 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर निवड समितीने सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) भविष्याबाबत चर्चा करण्याचं मोठं धाडस दाखवलं होतं. पाटील यांनी सचिनला जेव्हा विचारलं, तुझ्या पुढच्या योजना काय आहेत?, तेव्हा सचिन पूर्णपणे थक्क झाला होता. त्याने आश्चर्याने विचारलं, तुम्ही खरंच गंभीर आहात का? त्यावर पाटील यांनी होकार दिला. निवड समितीने त्याला निवृत्त व्हायला सांगितलं नव्हतं, पण आम्ही पर्यायांचा विचार करत आहोत, हे स्पष्ट केलं होतं. त्यानंतरच सचिनने स्वतःहून निवृत्तीचा निर्णय घेतला आणि जाहीर करण्यापूर्वी पाटील यांना फोन करून कळवलं होतं.

गौतम गंभीरचा अबोला : आजही माफ करायला तयार नाही

गौतम गंभीरला (Gautam Gambhir) संघातून डच्चू दिल्यानंतर त्याचे आणि संदीप पाटील यांचे संबंध पूर्णपणे संपुष्टात आले आहेत. पाटील यांनी सांगितले की, एकेकाळी गंभीर त्यांना नियमित फोन करायचा, पण आता परिस्थिती बदलली आहे. आम्ही अनेकदा न्यूज चॅनेलच्या शोमध्ये एकत्र असतो, पण गंभीर माझ्याकडे ढुंकूनही पाहत नाही. मी नमस्कार केला तरी तो प्रतिसाद देत नाही. गंभीर कधीच विसरत नाही आणि कधीच माफ करत नाही, अशा शब्दांत पाटील यांनी गंभीरच्या कडक स्वभावावर भाष्य केलं.

अमेरिका – इराण युद्धादरम्यान विधानभवन उडवून देण्याची धमकी ; मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडवर-

विराट-कुंबळे वाद आणि स्वतःच्या प्रशिक्षकपदाची चूक

विराट कोहली (Virat Kohli) आणि अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्यातील वादावर बोलताना पाटील यांनी स्वतःच्या अनुभवाचा दाखला दिला. ते म्हणाले की, कुंबळे तिथेच चुकले जिथे मी एकेकाळी प्रशिक्षक म्हणून चुकलो होतो. वरिष्ठ आणि प्रस्थापित खेळाडूंना समजून घेण्याऐवजी त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणं ही मोठी चूक ठरते. भारतीय बोर्डाने मला सहा महिन्यांतच प्रशिक्षकपदावरून हटवलं होतं आणि मला वाटतं तो निर्णय योग्यच होता, कारण मी खेळाडूंना प्रेरित करण्यात अपयशी ठरलो होतो, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.

follow us