CWG 2026: वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवची रौप्यला गवसणी; देशाला मिळवून दिले पाचवे पदक
CWG 2026: ज्ञानेश्वरीने स्नॅच प्रकारात तिसऱ्या प्रयत्नात 88 किलो, तर क्लीन अँड जर्क प्रकारात 111 किलो वजन उचलत एकूण 199 किलो वजन उचलत दुसरे स्थान पटकावले.
Gyaneshwari Yadav Weightlifting Silver Medal : छत्तीसगडची वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवने (Gyaneshwari Yadav ) कॉमनवेल्थ गेममध्ये रौप्यपदकाला (CWG 2026) गवसणी घातलीय. एकूण 199 किलो वजन उचलत भारताला पाचवे पदक जिंकून दिले आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला मिळालेले हे चौथे पदक ठरले.
ज्ञानेश्वरीने स्नॅच प्रकारात तिसऱ्या प्रयत्नात 88 किलो, तर क्लीन अँड जर्क प्रकारात 111 किलो वजन उचलत एकूण 199 किलो वजन उचलत दुसरे स्थान पटकावले. संपूर्ण स्पर्धेत तिची नायजेरियाच्या ओनोमे ओमोलोला डिडीह हिच्याशी चुरशीची लढत पाहायला मिळाली.
या खेळाडूंनीही भारताची मान उंचावली
यापूर्वी रविवारी मीराबाई चानू हिने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताची शान वाढवली होती. तसेच ऋषिकांत सिंह आणि राजा मुथुपांडी यांनीही रौप्यपदके जिंकत भारताच्या पदकतालिकेत भर घातली. याआधी भारताचे पहिले पदक झंडू कुमार यांनी पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंग प्रकारात 190 किलो वजन उचलून मिळवले होते.
प्रतिष्ठा सामंताचे पदक थोडक्यात हुकले
भारतीय जिम्नास्ट प्रतिष्ठा सामंता राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकण्याच्या अगदी उंबरठ्यावर येऊनही थोडक्यात अपयशी ठरली. महिलांच्या व्हॉल्ट अंतिम फेरीत ती सहाव्या स्थानावर राहिली. अंतिम फेरीसाठी तिने सातव्या क्रमांकावर पात्रता मिळवली होती. अंतिम फेरीत प्रतिष्ठाने चांगली कामगिरी करत पहिल्या प्रयत्नात 12.700, तर दुसऱ्या प्रयत्नात 12.666 गुण मिळवले. दोन्ही प्रयत्नांतील सरासरी 12.683 गुण इतकी झाली. तिची कामगिरी उल्लेखनीय असली तरी पदक मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या अव्वल तीन स्थानांमध्ये तिला स्थान मिळवता आले नाही.