माढ्यात जानकरांनी पवारांच्या हातावर तुरी दिली.. माढ्यात पवारांना उमेदवार सापडत नाही… माढ्यात भाजपची सीट निघणार? अशा अनेक चर्चा सुरु असतानाच शरद पवारांनी (Sharad Pawar) डाव टाकला. थेट धैर्यशील मोहिते पाटील यांना (Dhairysheel Mohite Patil) मैदानात उतरवत पवारांनी भाजपलाच धक्का दिला. मोहिते पाटील घराणे म्हणजे पवारांचे जुने स्नेही. 2019 मध्ये ‘सत्तेचा लाभ’ मिळविण्यासाठी त्यांनी भाजपची वाट धरली.पाच वर्षात बरीच धडपड करत मोहिते पाटलांनी सत्तेचा लाभ मिळवला, पण सत्तेच्या मुख्य वर्तुळात काही त्यांना जाता आला नाही. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या मोहिते पाटील कुटुंबियांनी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. पवारांनीही त्यांना जवळ केलं आणि थेट लोकसभेच्या मैदानात उतरवलं. इथंच मोहिते पाटलांनी पहिला टप्पा जिंकला.
पण माढा मतदारसंघातील सर्वच विद्यमान आमदार युतीसोबत असल्याने सुरुवातील मोहिते पाटलांना माढा जड जाईल, असं म्हंटलं जात होतं. त्यामुळे माढ्यातील समीकरण जुळवून आणून निवडणुकीत आघाडी घेणं हा मोहिते पाटलांसाठी दुसरा महत्वाचा टप्पा होता. तोच टप्पा आता मोहिते पाटलांनी पार केल्यानं माढ्यातील लढाई रंगतदार अवस्थेत आली आहे. सुरुवातील भाजपसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक आता मोहिते पाटलांनी दुरंगी केली आहे. त्यामुळे मोहिते पाटलांनी माढा ‘ओढत’ आणला आहे असचं म्हणावं लागेल…
याच पार्श्वभूमीवर पाहुया मोहिते पाटलांसोबत उघड उघड आणि छुप्या पद्धतीनं कोण कोण आहे. (Who is in Madha Lok Sabha constituency openly and covertly with dhairysheel Mohite Patil?)
माढा लोकसभा मतदारसंघात सांगोला, माळशिरस, फलटण, माण-खटाव, माढा, करमाळा या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या मतदारसंघात सांगोला मतदारसंघातून मोहिते पाटलांना शेकापची मोठी मदत होणार आहे. दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख आणि डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी या मतदारसंघातून मोहिते पाटलांना लीड देण्याचा पवारांना शब्दही दिला आहे. अकलूज-माळशिरस हा तर मोहिते पाटलांचा घरचा मतदारसंघ. इथूनच मोहिते पाटलांनी गत लोकसभेला भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना दिलेल्या एक लाखाच्या लीडची राज्यात चर्चा झाली होती. याशिवाय माळशिरसचे भाजपचे बडे नेते असलेले उत्तमराव जानकर यांनीही शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. लोकसभा मोहिते पाटलांना आणि विधानसभा आम्हाला अशी चर्चा झाल्याचं जानकरांनी सांगितलं आहे. जानकरांची या मतदारसंघात 35 ते 40 हजार मते असल्याचा दावा केला जातो.
करमाळ्यामध्ये माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पाटील 2014 ते 2019 या काळात शिवसेनेचे करमाळ्याचे आमदार होते. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांनीही तुतारी हाती घेतली आहे. त्यामुळे मोहिते पाटलांची ताकद वाढली आहे. त्यांना करमाळ्यातून लीड देण्याची जबाबदारी नारायण पाटलांनी उचलली आहे. माढ्यातून मोहिते पाटलांसोबत बडा चेहरा नाही. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दुसऱ्या स्तरातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोहिते पाटलांसोबत आहेत. याशिवाय शिवसेनेच्या संजय कोकाटे यांनीही नुकताच पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
फलटण मतदारसंघातून उघड उघड नसली तरी रामराजे नाईक निंबाळकांची छुपी ताकद मोहिते पाटलांसोबत आहे. रामराजेंचा भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना विरोध आहे. राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे आणि अजित पवार यांनी त्यांची समजूत काढली. पण त्याला फारसं यश आलेलं नाही. रामराजेंनी राष्ट्रवादी सोडली नसली तरी ते रणजीतसिंहांच्या प्रचारात दिसत नाहीत. त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे इथले आमदार दीपक चव्हाण हे मोहिते पाटलांसाठी छुपी ताकद गोळा करत आहेत. त्यामुळे फलटणमधून मोहिते पाटलांसाठी रामराजे नाईक निंबाळकर फॅक्टर मोठी भूमिका बजावताना दिसत आहे.
माण-खटावमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख शेखर गोरे, काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख मैदानात उतरले आहेत. अभयसिंह जगताप यांनीही मतदारसंघात पायाला भिंगरी लावून प्रचार सुरु केला आहे. अभियसिंह जगताप हे सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील म्हसवडचे रहिवासी आहेत. संगणक अभियंता असलेल्या जगताप यांची पुण्यात कंपनी आहे. शरद पवार यांच्या गटात ते मागील पाच ते सहा वर्षापासून सक्रियपणे काम करत आहेत. त्यांचे माण तालुक्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठे काम आहे. जगताप यांनी माढा लोकसभा मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत.
याशिवाय पंढरपूर तालुक्यातील 42 गावे माढा मतदारसंघात येतात. या भागात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अभिजीत पाटील यांची मदत मोहिते पाटलांना होऊ शकते. अभिजीत पाटील हेच आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून पवारांचे उमेदवार असू शकतात, असे बोलले जाते. सोबत माढा मतदारसंघात धनगर समाजाचीही मोठी मते आहेत. या मतांना कॅश करण्यासाठी शरद पवारांनी भुषणसिंह होळकांना सोबत घेतलं आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षपद देऊन ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे. थोडक्यात मोहिते पाटलांसोबत सत्ताधारी पक्षातील कोणी नसले तरीही विरोधी पक्षात अॅक्टिव्ह असणारा, पराभूत झालेला मोठा गट सोबत आहे. त्यामुळे त्यांनी माढ्याची एकतर्फी वाटणारी निवडणूक दुरंगी केली आहे यात शंका नाही.