Download App

नाईक-निंबाळकर की मोहिते पाटील? माढा अन् माळशिरस तालुका ठरवणार निकाल…

माढा मतदारसंघात कोण बाजी मारणार? रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsinah Naik Nimbalkar) की धैर्यशील मोहिते पाटील?

माढ्याच्या (Madha) हायव्होल्टेज सामन्यात कोण बाजी मारणार? रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsinah Naik Nimbalkar) की धैर्यशील मोहिते पाटील? (Dhairyasheel Mohite Patil) या प्रश्नाचे उत्तर येत्या 4 जूनलाच मिळणार आहे. पण या प्रश्नाच्या उत्तराचा अंदाज वर्तवण्याचे काम पुढील महिनाभर तरी होणार जाणार आहे. याचे कारण सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक मोहिते पाटलांनी अत्यंत चुरशीची केली. अखेरच्या टप्प्यापर्यंत ही निवडणूक एवढी चुरशीची झाली की जो कोणी निवडून येईल त्याचे मताधिक्य हे अगदीच 15-20 हजारांत असणार असल्याचं बोललं जातं. यातही कमी झालेल्या मतदानाने सर्वच राजकीय पक्षांची चिंता वाढवलेली आहे. पाहुया माढ्याच्या काट्यावरच्या सामन्यात कोण पुढे आहे आणि कोण मागे? (Who will win in Madha constituency? Ranjeetsinah Naik Nimbalkar or courageous Mohite Patil?)

माढ्यात यंदा 60 टक्के मतदान झालं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत माढ्यात 63.58 टक्के मतदान झाले होते. यंदा हा टक्का 7.56 टक्क्यांनी घसरला आहे. यात सर्वात जास्त मतदान हे फलटण येथे 64 टक्के तर सर्वात कमी म्हणजे 55 टक्के मतदान करमाळ्यात झालं. माढा तालुका 61 टक्के, माळशिरस 60 टक्के, माण 58 टक्के मतदान झाले. तर तणावपूर्ण वातावरणातही सांगोला तालुक्यात 60 टक्के मतदान झाले. यंदा मतदारसंघातील पाणी प्रश्न, उद्योग, एमआयडीसी, शेतीचे प्रश्न, कांद्याचे प्रश्न, मराठा आरक्षण अशा सगळ्या प्रश्नांभोवती ही निवडणूक फिरत राहिली. कांद्याने मतदान करतानाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. पण या सगळ्यावर मात करण्यासाठी इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. निंबाळकरांसाठी स्वतः देवेद्र फडणवीस माढ्याच्या रणांगणात उतरले. त्यांनी या मतदारसंघातील विविध आमदारांना जोडून घेत निंबाळकरांसाठी कामाला लावले. त्याशिवाय ऐनवेळच्या काही खेळ्या करून त्यांनी विरोधकांना कमकुवत करण्यात यश मिळवले. यामुळे निंबाळकरांचे पारडे जड वाटते.

शरद पवारांना आपला पक्ष चालवणं शक्य नसावं म्हणून…; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

माढ्यात खेडूत बेरकी मतदार ठरवणार जेता :

माढा मतदारसंघात माढा, करमाळा, सांगोला, माशळशिरस, फलटण आणि माण-खटाव असे सहा मतदारसंघ येतात. यातील फलटण शहर वगळता उर्वरित संपूर्ण मतदारसंघ गावखेड्यातील आहे. त्यामुळे गावाकडचा अत्यंत बेरकी आणि चाणाक्ष समजला जाणारा मतदारच माढ्याचा पुढचा खासदार ठरवणार आहे. पण यातही माढ्याचा निकाल हा अकलूज-माळशिरस आणि माढा तालुक्यामधूनच ठरणार असल्याचे सांगितले जाते. याचे कारण करमाळा, सांगोला, फटलण आणि माण-खटाव इथला सामना बरोबरीत सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे

कोणत्या मतदारसंघात कशी आहे परिस्थिती?

अकलूज-माळशिरस हा तर मोहिते पाटलांचा घरचा मतदारसंघ. इथूनच मोहिते पाटलांनी गत लोकसभेला भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना दिलेल्या एक लाखाच्या लीडची राज्यात चर्चा झाली होती. याशिवाय माळशिरसचे एकेकाळचे भाजपचे बडे नेते असलेल्या उत्तमराव जानकर यांनीही शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. त्यांनी अत्यंत कष्टाने मोहिते पाटलांचे काम केले. लोकसभा मोहिते पाटलांना आणि विधानसभा आम्हाला अशी चर्चा झाल्याचं जानकरांनी सांगितलं आहे. जानकरांची या मतदारसंघात 35 ते 40 हजार मते असल्याचा दावा केला जातो. इथे नरेंद्र मोदी यांची सभा झाली असली आणि राम सातपुते इथले भाजपचे विद्यमान आमदार असले तरीही त्याचा फारसा परिणाम झाला नाही, असे जाणकार सांगतात. त्यामुळे माळशिरसमधून मोहिते-पाटलांच लीड मिळण्याची शक्यता आहे.

माढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे आणि शिवसेनेचे शिवाजी सावंत हे दोन्ही प्रमुख गट एकत्र आल्याने बहुतांश ठिकाणी मनोमिलन झालेले दिसून आले. माढ्यातून मात्र मोहिते पाटलांसोबत बडा चेहरा नाही. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दुसऱ्या स्तरातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोहिते पाटलांसोबत आहेत. याशिवाय शिवसेनेच्या संजय कोकाटे यांनीही निवडणुकीपूर्वी पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. पण माढ्यातून काहीशी स्थिती रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना अनुकूल राहण्याची शक्यता आहे.

‘तो’ कार्यकर्ता पैसे वाटत होता, म्हणून मी रोखलं; दत्ता भरणेंचं स्पष्टीकरण

यंदा फलटणमध्येही गतवेळीप्रमाणेच बरोबरीचे चित्र दिसून येऊ शकते. रामराजे नाईक निंबाळकर यांनी गतवेळीप्रमाणे यावेळीही रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध कायम ठेवला. त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांनी अजितदादांसोबत असूनही रणजीतसिंहांचे काम केलेले नाही. त्यांनी मोहिते पाटलांना छुपी रसद मोठ्या प्रमाणात पुरवली आहे. दुसऱ्या बाजूला रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे याच भागातील आहेत. 2019 मध्ये रामराजेंच्या विरोधानंतरही फलटणमधून रणजीतसिंहांनी 1200 मतांचे मताधिक्य मिळविले होते. मग आता रामराजेंनी विरोध केला तरी असा काय फारसा फरक पडणार आहे? असा सवाल विचारला जात आहे. त्यामुळे आताही मोहिते पाटलांना इथून लीड मिळण्याची शक्यता नाही.

करमाळ्याची परिस्थितीती पाहिली तर इथून अपक्ष आमदार असलेले संजय मामा शिंदे हे अजित पवारांसोबत आहेत. त्यांनीच गतवर्षी रणजीतसिंहांविरोधात निवडणूक लढवली होती. वर्षांनुवर्षे आमदार राहिलेले जयंतराव जगताप हेही भाजपबरोबर आहेत. इथला बागल गट, चिवटे कुटुंब हे भाजपच्या मदतीला आहे. दुसऱ्या बाजूला करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पाटील 2014 ते 2019 या काळात शिवसेनेचे करमाळ्याचे आमदार होते. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे, पंचायत समितीचे सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्यांनीही तुतारी हाती घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच मोहिते पाटलांची ताकद वाढली होती. याशिवाय मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ काही गटांनी तुतारीचे काम केल्याचे बोलले जाते. त्यामुळे पक्षीय ताकदीमध्ये रणजीतसिंह नाईक निंबाळकर पुढे दिसून येत असले तरीही करमाळ्यातील गणित बरोबरीत सुटण्याची शक्यता आहे.

माण-खटावमधून भाजपचे आमदार जयकुमार गोरे आणि कार्यकर्त्यांनी रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी जीवाचे रान केले. पण राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख शेखर गोरे, काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुख मैदानात उतरले होते. अभयसिंह जगताप यांनीही मतदारसंघात पायाला भिंगरी लावून प्रचार केला आहे. अभियसिंह जगताप हे सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील म्हसवडचे रहिवासी आहेत. संगणक अभियंता असलेल्या जगताप यांची पुण्यात कंपनी आहे. शरद पवार यांच्या गटात ते मागील पाच ते सहा वर्षापासून सक्रियपणे काम करत आहेत. त्यांचे माण तालुक्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठे काम आहे. जगताप यांनी माढा लोकसभा मतदारसंघात दौरे केले.

सांगोला तालुक्यातून शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी रणजीतसिंह नाईक निंबाळकरांनी संपूर्ण ताकद लावली. या भागात झालेली पाण्याची कामे ही रणजीतसिंहांसाठी आणि शहाजीबापूंसाठी जमेची बाजू ठरण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी सांगोला मतदारसंघातून मोहिते पाटलांना शेकापची मोठी मदत मिळालेली दिसून आली. दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख आणि डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी या मतदारसंघातून मोहिते पाटलांना लीड देण्याचा पवारांना शब्दही दिला. त्याप्रमाणे त्यांनी मोहिते पाटलांचे कामही केले. ज्या कामांवर रणजीतसिंह नाईक निंबाळकर स्वतःचे नाव लावतात ती तर कामे गणपतराव देशमुखांनी केली होती, असा दावा करत देशमुख बंधूंनी प्रचाराचा धुरळा उडवला होता. त्यामुळे सांगोल्याचा सामना बरोबरीतच राहील, असे इथले स्थानिक पत्रकार सांगतात.

follow us