Download App

Maharashtra : 6 महिन्यांत 10 शहरांत धार्मिक तणाव; सोशल मीडिया की समाजविघातक प्रवृत्ती जबाबदार?

सातारा : खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे सोशल मीडिया आक्षेपार्ह पोस्टवरुन 2 गटात जोरदार राडा झाल्याचा प्रकार नुकताच समोर आला. समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्याच्या घटनेमुळे दोन गट आमने- सामने आले आणि वातावरण तणावग्रस्त बनलं. या हल्ल्यामध्ये 10 जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला. यानंतर जवळपास 200 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. (10th religious incident that has happened in the last six months in Maharashtra)

दरम्यान, पुसेसावळीच्या या प्रकरणामुळे धार्मिक आणि जातीय सलोख्याबाबत आदर्श मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात मागील सहा महिन्यात घडलेली ही दहावी धार्मिक घटना ठरली आहे. समाजमाध्यमांवरुन प्रसारित होणाऱ्या वादग्रस्त संदेशांमुळे वातावरण कलुषित होत असल्याचे पोलीसांचे निरीक्षण आहे. मात्र दर महिन्यात, पंधरा दिवसाला घडणाऱ्या या घटनांमुळे राज्यातील धार्मिक वातावरण नेमकं कोण खराब करत आहे असा सवाल विचारला जात आहे.

सहा महिने अन् दहा शहरे :

छत्रपती संभाजी नगर

31 मार्च : रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक, पोलीस गोळीबारात एक जण ठार. शेकडो जणांवर गुन्हे दाखल.

मुंबई

31 मार्च : मालाड मालवणी येथे रामनवमी मिरवणुकीच्यावेळी मोठ्याने ध्वनिक्षेपक लावण्यावरून वाद. 300 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

जळगाव

31 मार्च : पालधी, प्रार्थनास्थळासमोर मोठ्याने ध्वनिक्षेपक लावण्यावरून वाद.

अकोला

13 मे : समाजमाध्यमातील पोस्टवरून दंगल. 1 ठार, 10 जखमी.

नगर

14 मे : शेवगाव, छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवरून वाद. 30 जणांना अटक तर 150 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

6 जून : संगमनेर – लव्ह जिहादच्या विरोधात निघालेला मोर्चा संपताच समनापूर गावात दगडफेक

26 जुलै : उंबरे, लव्ह जिहादविरोधातील कोपरगावच्या मोर्चानंतर राहुरी आणि नेवासा तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातील तरुणांनी उंबरे येथील मशिदीवर हल्ला केला म्हणून 25 तरुणांवर दंगलीचे  गुन्हे दाखल.

नाशिक 

14 मे – त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर संदल प्रथेवरून वाद. 4 जणांना अटक. विशेष चौकशी पथकाकडून चौकशीचा आदेश.

कोल्हापूर

7 जून : समाजमाध्यमातील आक्षेपार्ह छायाचित्रांवरून गोंधळ, पोलिसांकडून बळाचा वापर, शेकडो जणांवर गुन्हे दाखल.

सातारा

10 सप्टेंबर : समाजमाध्यमातील आक्षेपार्ह मजकुरावरून दंगल. 1 ठार तर 10 पेक्षा अधिक जखमी. 200 जणांवर गुन्हे दाखल

Tags

follow us