Download App

Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशन 5 आठवड्यांचे घ्यावे, अजित पवारांची मागणी

राज्याच्या अर्थसंकल्पीय ( Budget Session )  अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे. विधीमंडळाचे सन 2023 साठीचे अधिवेशन सोमवार दिनांक 27 फेब्रुवारीपासून पासून विधान भवन, मुंबई ( Mumbai ) येथे सुरु होणार आहे. 27 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. अधिवेशनात राज्याचा वर्ष 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवार दि. 9 मार्च 2023 रोजी मांडला जाणार आहे.

हे अधिवेशन किमान पाच आठवड्यांचे तरी घ्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी ( Ajit Pawar ) केली आहे. आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. त्या बैठकीत पवारांनी ही मागणी केली. नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी केली असतानाही हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्यात आले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचे घ्यावे, असे पवारांनी म्हटले आहे.

तसेच यावेळी विधीमंडळ सदस्यांनी सभागृहात विविध आयुधांव्दारे उपस्थित केलेल्या प्रश्नांची योग्य, मुद्देसूद लेखी उत्तरे देण्यात यावीत, यासह इतर मागण्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केल्या.
दरम्यान या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सध्या अर्थखाते हे फडणवीसांकडे आहे. तर विधानपरिषदेत अर्थसंकल्प कोण सादर करणार याविषयी संभ्रम आहे. तसेच या अधिवेशनात मंत्रीमंडळ विस्तार होण्याची देखील शक्यता देखील वर्तवली जात आहे. या अर्थसंकल्पामध्ये आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही मोठ्या घोषणा होण्याची देखील शक्यता आहे. कारण आगामी काळात मुंबई महापालिकेसह अनेक मोठ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या निवडणुका होणार आहेत.

Tags

follow us