वारी आणि बारीतून महाराष्ट्र घडला, डॉ. शेषराव पठाडे यांचे प्रतिपादन

या सन्मानामुळे तमाशाला राजवैभव मिळाल्याचे सांगून पठाडे यांनी लावणीसम्राट ज्ञानोबा उत्पात यांची 'चला जेजुरीला जाऊ..

  • Written By: Published:
News Photo   2026 02 03T193009.380

महाराष्ट्राला वारी आणि बारीची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. (Sampraday) या दोन्ही माध्यमातून लोकजागृती आणि समाज जागृती साधली जाते. एवढेच नव्हे तर वारी आणि बारीद्वारे लोकमनाच्या मशागतीतून महाराष्ट्राची जडणघडण झाली असल्याचे प्रतिपादन शाहिरी वाङ्मयाचे अभ्यासक, जेष्ठ पत्रकार डॉ. शेषराव पठाडे यांनी येथे केले. ज्योतिर्मय आयोजित साहित्योत्सवात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पठाडे बोलत होते. यावेळी त्रिपुरा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वि. ल. धारूरकर, ज्येष्ठ गायक दीपक गिरी, डॉ. मंगला वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. पठाडे यांनी “वारी आणि बारी” या विषयावरील सप्रयोग व्याख्यानाची सुरुवात “आधी गणाला रणी आणा हो नाहीतर रंग पुन्हा पुन्हा सुना सुना” आणि “लवकर यावे सिद्ध गणेशा, आतून कीर्तन वरून तमाशा” या गणांनी केली. डॉ. पठाडे म्हणाले, कीर्तन ऐकलं नाही आणि तमाशा पाहिला नाही तो मराठी माणूसच नाही. लोककला हा लोकप्रबोधनाचा जागर आहे. महाराष्ट्रातील असंख्य ज्येष्ठ-श्रेष्ठ लोककलावंतांनी लोकजागराची मशाल पेटती ठेवली आहे.

कीर्तनाची आणि तमाशाची सुरुवातही मंगलचरणाने, गणेश वंदनेने होते आणि शेवटही “माऊली गुरु माऊली..” ने होतो. याचे कारण म्हणजे ज्ञानोबा-तुकोबांच्या विचारांचा आणि भगवंताच्या नामस्मरणाचा मराठी मनावरील प्रभाव अभंग आणि अखंड आहे. प्रसिद्ध तमाशा कलावंत (स्व.) दत्ता महाडिक पुणेकर यांचे संत तुकाराम हे वगनाट्य आणि त्यातील तुकारामांचा वैकुंठगमनाचा प्रसंग पाहताना तमाशा रसिक भावविभोर होऊन अश्रू ढाळत. गुरुवर्य लावणीसम्राट ज्ञानोबा उत्पात म्हणत, अभंग हे मराठी शारदेच्या हातातील टाळ, तर लावणी मराठी शारदेच्या पायातील चाळ आहेत.

पारंपरिक लावणीची पताका फडकवत ठेवा : डॉ. शेषराव पठाडे

सामाजिक विवेक जागे ठेवण्याचे काम वारी आणि बारीतून झालेले आहे. एवढेच नव्हे तर या दोन्ही लोककलांनी माणसं जोडली, विचार जोडले आणि समाजामध्ये विवेक उतरविण्याचे प्रभावी कार्य केले आहे. पेशवेकालीन शाहिरांनी केवळ शृंगारिक लावण्याच लिहिल्या नाही, तर अध्यात्मिक आणि देव-दैवतांच्या लावण्या लिहून लोकांचे प्रबोधन केले‌. पारंपरिक लावणी तमाशाचा वसा अनेकांनी जीवापाड जपला आहे. आज काही प्रमाणात हा प्रभाव खंडित झाल्यासारखं वाटत असला तरी कलेवर अपार जीवननिष्ठा असलेल्या अनेकांनी हा झरा अखंडपणे खराळता ठेवला आहे, त्याचेच फळ म्हणून यंदा प्रथमच ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारने पद्मश्री हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केला.

या सन्मानामुळे तमाशाला राजवैभव मिळाल्याचे सांगून पठाडे यांनी लावणीसम्राट ज्ञानोबा उत्पात यांची ‘चला जेजुरीला जाऊ..’ ही अध्यात्मिक आणि ‘वाटलं होतं तुम्ही याल…’ ही शृंगारिक लावणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रारंभी दैनिक ज्योतिरमाईचे मुख्य संपादक संजय व्यापारी यांनी डॉ. पठाडे यांचे स्वागत केले. निवेदक आनंद काळे यांनी पठाडे यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन आनंद काळे यांनी केले.

Tags

follow us