संतत्व म्हणजे मातृत्व आणि हेच समाजाला जोडून ठेवतात, ‘महाराष्ट्र वारकरी किर्तनकार गोलमेज परिषदे’त किर्तनकार व तज्ज्ञांचा सूर

Maharashtra Warkari Kirtankar : “विखुरलेल्या समाजाला चालना देण्यासाठी संताचे विचार अत्यंत महत्वाचे आहे. या समाजाला जोडण्याचे कार्य केवळ वारकरी संप्रदायनेच केले आहे. हा संप्रदाय म्हणजे समन्वयाचे स्त्रोत आहे. संतत्व म्हणजे मातृत्व असून हेच समाजाला जोडून ठेवतात.” असा सूर परिषदेत सहभागी सर्व कीर्तनकार व संत साहित्य अभ्यासक तज्ज्ञांनी काढला. ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ एज्युकेशन (MIT World Peace University’s School of Education) , पुणे’ व ‘एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद’ (MIT-National Sarpanch Sansad) यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमानवाडी आळंदी (देवाची) येथील डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल (Dr. Vishwanath Karad World Peace School) येथे आयोजित दोन दिवशीय ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’चे (Maharashtra Warkari Kirtankar) तिसरे सत्र ‘वारकरी संप्रदायाच्या सामाजिक प्रबोधनाची लोककल्याणकारी वाटचाल’ या विषयावर संपन्न झाले. यासत्रात हा सूर निघाला.
प्रसंगी पंढरपुर येथील वै.हभप श्रीगुरू अप्पासाहेब वासकर महाराज फड चे प्रमुख हभप देवव्रत (राणा) महाराज वासकर, आळंदी येथील हभप डॉ. नारायण महाराज जाधव, श्रीवरद विनायक संस्थानचे प्रमुख हभप उध्दव महाराज मंडलिक, पुणे विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे प्रा. हभप डॉ. दिनेश रसाळ, सामाजिक उद्योजक व आरएफआयडी-एनएफसी तंत्रज्ञानाचे प्रणेते असीम पाटील आणि संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व अर्थव्यवहार विश्लेषक अभय टिळक हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड होते. तसेच संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांची विशेष उपस्थिती होती. तसेच, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, पद्मश्री पोपटराव पाटील व परिषदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील उपस्थित होते. दिनेश रसाळ म्हणाले,”जगाचे कल्याण हे केवळ संतांच्या विचारातच आहे. त्यामुळे साधु संतांच्या समतेचा विचार समाजाता रुजवावा. यांंनी समाजात माणुसकीचा संदेश दिला आहे. वसुधैव कुटुम्बकमची भावना ठेवणारे संत यांच्या आचरणांमुळेच समाजाची घडी व्यवस्थित बसली आहे. समाजाला सुखी ठेवण्यासाठी सर्वांनी द्वेष वृत्ती संपवावी.”
हभप देवव्रत (राणा) महाराज वासकर म्हणाले,” वर्तमान काळात वारकरी संप्रदायावर होणार्या अतिक्रमणाला आळा घालणे आवश्यक आहे. येणार्या काळात शैक्षणिक क्षेत्रात वारकरी अभ्यासक्रमाचा समावेश करणे गरजेचा आहे.”
उद्धव महाराज मंडलिक म्हणाले,”आधुनिक काळात वारकरी संप्रदायाला संकुचित होऊन चालणार नाही. विश्व कल्याणाचा विचार करता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संतांचे, कीर्तनकारांचे विचार सर्वदूर पसरवावे. वारकरी समाजाने समाजाला जोडण्याचे काम करीत आहेत. विखूरलेल्या या समाजाला एकत्रित जोडण्याचे कार्य आणि बळ केवळ वारकरी संप्रदायातच आहे.”
असीम पाटील म्हणाले,” समाज प्रबोधनाचे कार्य वारकरी संप्रदाय करीत आहे. वारीमध्ये चालणार्या प्रत्येक वारकर्याला त्याच्या मनातील सर्व प्रश्नांचे उत्तर मिळतात. शुद्ध व शाकाहरी भोजनामुळे व्यक्तीच्या विचार सरणीत खूप मोठा बदल घडतो. ”
कमाईत Swiggy, Zomato डिलिव्हरी बॉईज पुढे; आयटी कंपन्यांच्या फ्रेशर्सपेक्षा जास्त पगार
डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,”समाज व गावाचे परिवर्तनात महत्वाची भुमिका बजाविण्यासाठी महाराष्ट्र वारकरी किर्तनकार गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून होत असलेले मौलिक लोककल्याणाचे कार्य, आध्यात्मिक प्रबोधनाबरोबरच लोक जीवनातील विविध दैनंदिन समस्यांच्या निराकरणासाठी अधिकाधिक कसे उपयोगी होईल. या विषयावर विविध अंगाने विचारमंथन होत आहे.” तसेच, आळंदी येथील हभप डॉ. नारायण महाराज जाधव, अभय टिळक, योगेश पाटील यांनी वारकरी संप्रदायामुळे लोकांचे कसे कल्याण होते. ज्ञानोबांनी घालून दिलेल्या पायामुळे हा समाज आज ही टिकलेला आहे या वर भाष्य केले. सूत्रसंचालन डॉ. शलिनी टोणपे यांनी केले. योगेश पाटील यांनी आभार मानले.