ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणि पुरस्कार जाहीर; चित्रपट महोत्सवात होणार वितरण
चित्रपटातील प्रसंगांना भावनिक खोली देणारे पार्श्वसंगीत आणि कथानकाला पूरक ठरणारी संगीतरचना ही इलयाराजा यांची प्रमुख ओळख आहे.
भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल (Film) दिला जाणारा पद्मपाणि पुरस्कार चित्रपट संगीताला नवी दिशा देणारे ज्येष्ठ भारतीय संगीतकार इलयाराजा जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप पद्मपाणि सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व दोन लाख रूपये असे आहे.
२८ जानेवारी ते ०१ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान अजिंठा – वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. पद्मपाणि पुरस्कार निवड समितीने इलयाराजा यांची निवड केली असून या समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक लतिका पाडगांवकर तर सदस्यपदी चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर व चंद्रकांत कुलकर्णी यांचा समावेश होता. पुरस्काराची घोषणा संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकुमार कागलीवाल यांनी केले.
पद्मपाणि पुरस्कार प्रदान सोहळा मान्यवरांच्या हस्ते महोत्सव उद्घाटन एमजीएम परिसरातील रुक्मीणी सभागृहात २८ जानेवारी रोजी बुधवारी सायंकाळी ५:३० वाजता होणार आहे. महोत्सव पुढील पाच दिवस आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ इलयाराजा यांनी भारतीय चित्रपटसंगीतात सातत्यपूर्ण आणि सर्जनशील योगदान दिले आहे.
आतापर्यंत त्यांनी ७,००० हून अधिक गाणी तसेच १,५०० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संगीत निर्मिती केली आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी, मराठी आदी विविध भारतीय भाषांमधील त्यांच्या संगीतरचनांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. कर्नाटकी संगीत, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व लोकसंगीताच्या बाजावर आधारलेले, तसेच पाश्चात्त्य सिम्फनीची शिस्त लाभलेले संगीत ही त्यांची प्रमुख ओळख आहे.
चित्रपटातील प्रसंगांना भावनिक खोली देणारे पार्श्वसंगीत आणि कथानकाला पूरक ठरणारी संगीतरचना ही इलयाराजा यांची प्रमुख ओळख आहे. कला, करुणा आणि सर्जनशील साधनेचे प्रतीक मानल्या जाणार्या पद्मपाणि पुरस्कारासाठी इलयाराजा यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या संगीतातील आध्यात्मिकता, शिस्त आणि मानवी संवेदनशीलतेमुळे ते जनमानसात ते संगीतक्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.
नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालय व महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने होत आहे.
