फडणवीस सरकारकडून बदल्यांचा सपाटा सुरूच; आयुक्त डॉ. अभिजित चौधरींची मोठ्या पदावर नियुक्ती

डॉ. अभिजित यांची नियुक्ती आता पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तपदी करण्यात आली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 131

Commissioner Dr. Abhijit Chaudhary appointed to a senior position : नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या बदलीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार चौधरी यांची नियुक्ती आता पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीएच्या महानगर आयुक्तपदी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रशासनात पुन्हा एकदा बदल्यांचा धडाका कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात सातत्याने वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघत असून, या आठवड्यात देखील ही परंपरा कायम राहिली आहे.

बदलीच्या आदेशात काय नमूद?

शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, डॉ. अभिजित चौधरी यांची नियुक्ती महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे या पदावर करण्यात आली आहे. ते योगेश म्हसे यांच्या जागी कार्यभार स्वीकारणार आहेत. आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, चौधरी यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार डॉ. विपीन इतंकर यांच्याकडे तात्काळ सोपवून नव्या पदाची जबाबदारी स्वीकारावी.

नागपूरमधील कार्यकाळ कसा राहिला?

डॉ. अभिजित चौधरी यांनी 4 जुलै 2023 रोजी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात अनेक आव्हाने होती. पालिकेची आर्थिक परिस्थिती डळमळीत असताना राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्यावर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करतात, असे आरोपही करण्यात आले. मात्र शांत स्वभावाचे चौधरी यांनी वादांना फारसे उत्तर न देता कृतीतून काम कारण्यावर भर दिला. महापालिकांच्या राष्ट्रीय रँकिंगमध्ये नागपूरला अव्वल स्थान मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र त्यात अपेक्षित यश मिळाले नाही.

कोण आहेत डॉ. अभिजीत चौधरी?

डॉ. अभिजित चौधरी हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील रहिवासी आहेत. त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून 2008 साली एमबीबीएस पदवी मिळवली. त्यानंतर प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेत त्यांनी स्पर्धा परीक्षा दिली. त्यांची विशेष ओळख म्हणजे त्यांनी भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) या दोन्ही सेवांमध्ये यश संपादन केले आहे. 2010 साली IPS साठी आणि 2011 साली IAS साठी त्यांची निवड झाली होती. ही दुहेरी कामगिरी अत्यंत उल्लेखनीय मानली जाते.

राज्यातील विविध जबाबदाऱ्या

गेल्या दशकभरात त्यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. उस्मानाबाद आणि नांदेड येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा जिल्हाधिकारी, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त, सांगलीचे जिल्हाधिकारी तसेच छरत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अशा विविध पदांवर त्यांनी काम पहिले आहे. आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या जबाबदारीमुळे त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील आणखी एक महत्वाचा अध्याय सुरू होत आहे. पुण्यारख्या झपाट्याने वाढणाऱ्या महानगर प्रदेशाच्या विकासाचा वेग, नियोजन आणि अंमलबजावणी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us