मोठी बातमी : धडाडीचे आयपीएस विश्वास नांगरे आता नागपूर शहराचे आयुक्त !
Vishwas Nangare Patil-Vishwas Nangare Patil-रविंद्र सिंघल हे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक असणार आहेत.
Maharashtra Police Transfer: राज्य सरकारने पुन्हा एकदा पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. धडाडीचे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांच्यावर नागपूर पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहेत. तर रविंद्र सिंघल (Ravindra Singhal) हे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक असणार आहेत.
अप्पर पोलिस महासंचालक श्रेणीतील दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक विश्वास नागरे यांची नागपूर शहर पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. तर नागपूरचे आयुक्त रविंद्र सिंघल यांची नांगरे यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर हे गुन्हेगारीच्या बाबतीत संवेदनशील शहर आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होम ग्राउंड आहे.
विश्वास नांगरे यांनी लातूर, अहिल्यानगर, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. त्यानंतर दक्षिण मुंबईचे पोलिस उपायुक्त होते. त्याचवेळी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हा नांगरे यांनी ताज हॉटेल परिसरात धाडसी कारवाी केली होती. त्यानंतर ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी कारभार पाहिला. औरंगाबाद, कोल्हापूर परिक्षेत्राचे ते महानिरीक्षक होते. त्यानंतर नाशिकचे पोलिस आयुक्त होते. कायदा व सुव्यवस्थेचे सहपोलिस आयुक्त होते. सध्या ते महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)चे अतिरिक्त पोलिस महासंचालक होते.
बदल्या झालेले अधिकारी
पोलीस उपआयुक्त छ. संभाजीनगर शहरचे प्रशांत मोहिते यांची नवी मुंबईला उपआयुक्त म्हणून बदली झाली आहे. हिंगोलीचे पोलिस अधीक्षक निलभ रोहन यांची नांदेडला पोलिस अधीक्षकपदावर नियुक्ती झाली आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक यांची पुणे शहरात, तर खामगावचे अप्पर पोलिस अधीक्षक श्रेणीक लोढा हे हिंगोलीचे पोलिस अधीक्षक असणार आहेत.
नवी मुंबईचे उपायुक्त रुपाली अंबुरे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात पोलिस अधीक्षक, नागपूर शहरचे शशिकांत सातव संभाजीनगर शहरमध्ये उपआयुक्त असणार आहे. अमरावतीचे शहरचे पोलिस उपआयुक्त रमेश धुमाळ यांची नागपूर शहरला, तर राज्य राखीव पोलिस बल गट चंद्रपूरचे पीयूष जगताप खामगावचे अप्पर पोलिस अधीक्षक असणार आहेत. नारायण शिरगांवकर यांची राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३ गडचिरोली येथून राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १९ कुसळगांव, अहिल्यानगर येथे बदली झाली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या प्रांजली सोनवणे या आता अमरावती शहरच्या पोलिस उपआयुक्त असणार आहेत.