13 people die suspiciously due to poisonous liquor : पुण्यातील विषारी दारू कांडाने संपूर्ण शहर हादरलं आहे. मागील दोन दिवसांत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात तब्बल 13 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला असून, या मृत्यूमागे विषारी दारू कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी आणि पिंपळे गुरव परिसरात 24 तासांत 8 जणांचा मृत्यू झाला. तर पुण्यातील हडपसर आणि काळेपडळ परिसरात आणखी 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मृतांमध्ये अनेक जण मजूर आणि सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये राहुल शरद क्षीरसागर, विजय भूकुरलाल शर्मा, अरुण डाडर, अशोक रमेश चव्हाण यांचा समावेश आहे. तर पिंपरी चिंचवड परिसरातील मृतांमध्ये पांडुरंग फुगे, विजय राठोड, राजेंद्र राठोड, राजू राजपूत, अकबर पठाण, बाबा शेख, आनंद देसाई आणि आनंद निकाळजे यांचा समावेश आहे.
लग्नासाठी काहीही! पुण्यात तरुणाचे अपहरण करून बीडला नेले, तरुणींसह 7 जणांना अटक
दरम्यान, या प्रकरणात आणखी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. सुभाष डिगीकर यांच्यावर मेडी पॉईंट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर अक्षय अवसरमल यांच्यावर यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत्यू झालेल्या सर्व व्यक्तींना पोटदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास होत असल्याची समान लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे विषारी दारू सेवनामुळेच हे मृत्यू झाल्याचा संशय अधिक बळावत आहे. मात्र, अधिकृत पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणी हडपसर आणि काळेपडळ पोलिसांकडून तपास सुरू असून, अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. तरीही पोलिसांनी मोठी कारवाई करत योगेश वानखेडे या आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर यापूर्वीही तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्याकडून आणखी चौकशी सुरू आहे. पुण्यातील या विषारी दारू प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिस आणि प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
