Download App

अहिल्यानगर जिल्ह्यात आयुष्मान कार्ड निर्मितीसाठी विशेष मोहीम; 41 लाख लाभार्थी पात्र

Ayushman Card : जिल्ह्यात १० लाख ५५ हजार कुटुंबांचा समावेश असून, यामधील ४१ लाख ६५ हजार लाभार्थी आयुष्यमान कार्डसाठी (Ayushman Card) पात्र

  • Written By: Last Updated:

Ayushman Card : जिल्ह्यात १० लाख ५५ हजार कुटुंबांचा समावेश असून, यामधील ४१ लाख ६५ हजार लाभार्थी आयुष्यमान कार्डसाठी (Ayushman Card) पात्र ठरले आहेत. आतापर्यंत १८ लाख २३ हजार आयुष्मान कार्ड तयार करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र लाभार्थ्यांनी आपले आयुष्मान कार्ड काढावेत, यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष मोहिमेत नागरिकांनी कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

जिल्ह्यात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) यांची एकत्रित अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनांमुळे लाभार्थ्यांना प्रति कुटुंब ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार असून १३५६ प्रकारच्या शस्त्रक्रिया व विशेष उपचारांचा समावेश आहे. तसेच कुटुंबातील ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना “आयुष्मान भारत वय वंदना कार्ड” च्या माध्यमातून अतिरिक्त ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील सदस्याकडे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड असणे आवश्यक आहे. हे कार्ड स्वतः लाभार्थी, आशा स्वयंसेविका, आपले सरकार सेवा केंद्र तसेच स्वस्त धान्य दुकानदार (राशन दुकानदार) यांच्यामार्फत सहज उपलब्ध आहे. तसेच गूगल प्ले स्टोअरवरून “आयुष्मान ॲप” डाउनलोड करूनही सुविधा मिळू शकते.

लाभार्थ्यांनी कार्ड तयार करण्यासाठी https://beneficiary.nha.gov.in/](https://beneficiary.nha.gov.in/ या पोर्टलवर भेट द्यावी किंवा गूगल प्ले स्टोअरवरून “आयुष्मान ॲप” डाउनलोड करून आवश्यक माहिती भरावी. आधार क्रमांक, राशन कार्ड व नोंदणीकृत मोबाईल क्रमांक यांच्या आधारे ओटीपी टाकून नोंदणी करता येते. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांची माहिती भरून, छायाचित्रासह अर्ज सादर करून कार्ड डाउनलोड करता येते. या प्रक्रियेसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड व लाभार्थ्याचा जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.

मोठी बातमी, आशिया कपमध्ये खेळणार नाही पाकिस्तान, ‘या’ संघाची एन्ट्री होणार

लाभार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ३१ ऑगस्ट २०२५ यापर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व सरपंच यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केल्या आहेत.

follow us