सडेतोड राजकीय भूमिका घेणाऱ्या डॉ. संग्राम पाटलांना मुंबई विमानतळावरून पोलिसांनी घेतले ताब्यात
पहाटे सुमारे 2 वाजल्यापासून डॉ. पाटील आणि त्यांच्या पत्नीला चौकशीच्या नावाखाली ताब्यात ठेवण्यात आल्याचा आरोप.
Dr. Sangram Patil taken into custody by police from Mumbai airport : लंडनहून मुंबईत परतताच सोशल मीडियावर परखड भूमिका मांडणारे डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे सुमारे 2 वाजल्यापासून डॉ. पाटील आणि त्यांच्या पत्नीला चौकशीच्या नावाखाली ताब्यात ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या कारवाईवर प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ही कारवाई अन्यायकारक असून छळवादी स्वरूपाची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. डॉ. संग्राम पाटील हे लंडनमध्ये वास्तव्यास असून, सोशल मीडियावर स्पष्ट आणि सडेतोड भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात.
पोलिसांकडून डॉ. पाटील यांच्याकडून चांगल्या वागणुकीचा बॉण्ड लिहून घेऊन काही अटी-शर्तींसह त्यांची सुटका करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणतीही अन्यायकारक कारवाई होऊ नये तसेच राजकीय दबावाखाली पोलिस यंत्रणेचा गैरवापर होऊ नये, अशी मागणी असीम सरोदे यांनी केली आहे. त्यांनी ही माहिती आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. दरम्यान, डॉ. संग्राम पाटील यांना ताब्यात घेतल्याच्या घटनेनंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे.
मुलगा आणि सून भाजपवासी; तुतारी मिरवणारे बापू पठारे कोणाचा करणार प्रचार?
‘डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर येताक्षणीच पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आलं, याचा निषेध करावा तेवढा कमी आहे,’ असे सपकाळ म्हणाले. ‘सडेतोड राजकीय भूमिका घेणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांची अटक ही आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नाचक्की करणारी आहे. नेमकी कोणत्या कारणामुळे ही कारवाई करण्यात आली, याचा खुलासा मुंबई पोलीस आणि गृह मंत्रालयाने तातडीने करावा. या दडपशाहीचा आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून जाहीर धिक्कार करतो,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
