मुंबई : तिरुपती येथे दर्शनासाठी गेलेल्या सोलापूर (Solapur) येथील भाविकांच्या वाहनाला बुधवारी अपघात झाला. त्यात सोलापूर येथील पाच तरुणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दु:ख व्यक्त करतानाच मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
सोलापुरातून नऊ तरुण तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गाडी मध्ये गेले होते. दर्शन करून परतताना त्यांच्या कारला मोठा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
त्यांच्यावर तिरूपती देवस्थानच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी जखमींच्या उपचाराबाबत सोलापूर प्रशासनाला निर्देश दिले. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
तिरुपती येथील बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील 5 तरुणांच्या अपघाती मृत्यूचे वृत्त दुःखद आहे. देवदर्शन घेऊन परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. मृतांच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. दिवंगतांच्या आत्म्यास सद्गती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली!