पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विरधवल जगदाळे तर उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील बिनविरोध

निवडणुकीत विरधवल कृष्णराव जगदाळे यांची अध्यक्षपदी, तर विवेक प्रतापराव वळसे पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

  • Written By: Published:
Untitled Design 45

Pune Zilla Parishad President and Vice President elected unopposed : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत विरधवल कृष्णराव जगदाळे यांची अध्यक्षपदी, तर विवेक प्रतापराव वळसे पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ही घोषणा जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीतील यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख-मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, भुषण जोशी तसेच नवनिर्वाचित सदस्य आणि पंचायत समित्यांचे सभापती उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1969 मधील कलम 45(2) तसेच संबंधित निवडणूक नियम 1962 नुसार ही निवड प्रक्रिया पार पडली.

प्रदूषण रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, पर्यावरण कर वाढला; मोटार वाहन कर सुधारणा विधेयक एकमताने मंजूर

अध्यक्ष पदासाठी विरधवल जगदाळे आणि विजयसिंह बाबासाहेब शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, शिंदे यांनी माघार घेतल्यामुळे जगदाळे यांची निवड बिनविरोध झाली. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष पदासाठी विवेक वळसे पाटील आणि मंगेश गुलाबराव काकडे यांनी अर्ज दाखल केले होते. काकडे यांनी माघार घेतल्याने वळसे पाटील यांचीही बिनविरोध निवड निश्चित झाली.

निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीला सर्व नामनिर्देशन पत्रांचे वाचन करून ती वैध असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. बैठकीच्या प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

follow us