Download App

LIC चे 55 हजार कोटी अदानींकडं अडकलेत, त्याचं काय होणार?

मुंबई : मुंबई व दिल्लीच्या तुरुंगात ईडी (ED)व सीबीआयनं (CBI)अनेक प्रतिष्ठित उद्योगपतींना पाच-पंचवीस कोटींच्या व्यवहारासाठी डांबून ठेवलंय. सर्व पार्श्वभूमीवर गौतम अदानी (Gautam Adani)व त्यांच्या कंपन्यांनी केलेले व्यवहार धक्कादायक असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितलंय. एलआयसीत (LIC) मध्यमवर्गीयांचा पैसा सर्वाधिक गुंतलाय. याच एलआयसीचे 55 हजार कोटी अदानी समूहात (Adani Group)आता अडकले आहेत. या पैशांचं काय होणार? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केलाय.

राऊत म्हणाले, मनी लाँडरिंग, शेल कंपन्यांचे व्यवहार त्यात आहेत. अदानी समूहावर भारतीय बँकांचं दोन लाख कोटींच्या वर कर्ज आहे. त्यात सर्वाधिक कर्ज भारतीय स्टेट बँकेचं आहे. आपल्या संपत्तीची किंमत वाढवून, चढवून अदानी समूहानं हे कर्ज मिळवलंय आणि कर्ज मिळवण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न करण्यात आल्याचं राऊत यांनी सांगितलंय.

राऊत म्हणाले की, गौतम अदानी व त्यांच्या साम्राज्याचा पाया देशाचे पंतप्रधान मोदी यांनी घातला हे कोणीच नाकारणार नाही. उद्योगपती व त्यांचं साम्राज्य वाढवणं यात चूक नाही, पण ते साम्राज्य म्हणजे देश असा देखावा उभा करणं हा अपराध असल्याचंही त्यांनी सांगितलं.

टाटा, बिर्ला, बजाज, हिंदुजा यांनी स्वतःला कधीच राष्ट्र मानलं नाही. त्यांच्या उद्योगांतही चढउतार झाले तेव्हा हा राष्ट्रावर हल्ला असल्याचंही सांगितलं नाही. अदानी यांनी स्वतःला राष्ट्र मानले. मोदी व अदानी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे या लोकांनी ठरवलंय. तेव्हा अदानींमुळं देशाचे सध्या जे नुकसान सुरू आहे, त्याची जबाबदारी मोदींच्या सरकारनंच घ्यायला हवी.

संजय राऊत म्हणाले, अदानी प्रकरण वाटतंय तितकं सहज सोपं नाही. ते फक्त कॉर्पोरेट युद्ध नाही. भाजप त्यांचे आर्थिक व्यवहार, लोकशाहीचा गळा घोटून पैशाच्या ताकतीवर सत्ता टिकवण्याच्या प्रवृत्तीवर झालेला हा हल्ला आहे. भविष्यात असे आणखी हल्ले होतील. त्याचे परिणाम 2024 ला दिसतील असंही खासदार संजय राऊत म्हणाले.

Tags

follow us