Download App

‘भिडेला वेळीच ठेचा’, जितेंद्र आव्हाडांच्या फिर्यादीवरुन संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल…

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे(Sambhaji Bhide) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन राज्यात वादंग पेटलं आहे. राज्यभरातून भिडे यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यात येत असतानाचा आता राष्ट्रवादीच्या आमदाराने स्वत: पोलिस ठाणे गाठून भिडेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी स्वत: ठाणे पोलिस ठाण्यात भिडेंविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती आव्हाडांनी ट्विटरद्वारे दिलीयं.

Sambhaji Bhide : भाजप खासदार संभाजी भिडेंच्या पाठिशी, यशोमती ठाकुरांनाही ललकारलं…

दरम्यान, संभाजी भिडे हे याआधीही अनेकदा वादग्रस्त विधाने करुन चर्चेत आलेले आहेत. आता त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्यासह शिर्डीच्या साईबाबांवरही वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यामुळे भिडेंविरोधात संतापाची लाट उसळत आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विटमध्ये संताप व्यक्त केला आहे.

जितेंद्र आव्हाड ट्विटमध्ये म्हणाले, “प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार मी नौपाडा पोलीस स्टेशन येथे मन्या भिडे याच्या विरोधात स्वत: जाऊन फिर्याद दिली. ज्याच्याविरुद्ध खरंतरं राष्ट्राद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा; त्या मन्या भिडे विरुद्ध पोलिसांनी आज कमीत कमी गुन्हा तरी दाखल करुन घेतला. नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये आज FIR No. 0224/2023 अन्वये FIR रजिस्टर करण्यात आला. तक्रारदार मी स्वत:च होतो. आता शासनाकडे एवढीच विचारणा आहे की, 153 (ब) का लावण्यात आला नाही आणि या मन्या भिडेला अटक कधी करणार?” असा सवाल आव्हाडांकडून करण्यात आला आहे.

टिळक पुरस्कार वितरणाला शरद पवार हे उपस्थित राहणारच ! विरोध करणाऱ्यांना रोहित पवारांनी सुनावले

तसेच जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी भिडे यांचा उल्लेख अफझल खानाचा वकील कृष्णा कुलकर्णी याच्या औलादी आणि समाजघातक किडा असा केला आहे. महिलांनी समाजमाध्यमांमधून व्यक्त व्हा. अन्यथा, महिलांना पुन्हा त्या काळात जावे लागेल. ज्या काळात महिलांना उपभोग्य वस्तू म्हणून ओळखले जात होते. भिडे हा समाजघातक किडा असून त्याला वेळीच ठेचा, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, भिडेंविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता बुधवारपर्यंत भिडेंना अटक केली नाहीतर सभागृह चालू देणार नसल्याचा इशाराच आव्हाड यांनी दिला आहे. नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, प्रकाश पाटील, सुजाता घाग, सुरेखा पाटील, विक्रम खामकर तसेच काँग्रेसचे विक्रांत चव्हाण असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

follow us