A pause for Operation Tiger? : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ घडताना दिसत आहे. गेल्या दीड वर्षांपासून चर्चेत असलेले शिवसेना शिंदे गटाचे कथित ऑपरेशन टायगर अखेर प्रत्यक्षात आल्याची चर्चा सुरू असतानाच या संपूर्ण घडामोडींना आता नाट्यमय वळण मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती, मात्र दिल्लीतील या राजकीय भूकंपाआधीच या ऑपरेशनला तात्पुरता ब्रेक लागल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष उद्या होणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीकडे लागले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटातील खासदार स्वतंत्र गट स्थापन करून शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्याच्या तयारीत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. यासाठी आवश्यक असलेल्या सह्यांची प्रक्रिया देखील जवळपास पूर्ण झाल्याचे सांगितले जात होते. मात्र अखेरच्या टप्प्यात दोन महत्वाच्या खासदारांच्या भूमिकेमुळे संपूर्ण समीकरण बदलल्याची माहिती समोर येत आहे.
खासदार संजय दिना पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सह्या संबंधित पत्रावर झाल्या नसल्याने ऑपरेशन टायगरची गती मंदावल्याने सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांचे मतदारसंघ भाजपच्या प्रभावक्षेत्रातील मानले जातात. त्यामुळे भविष्यातील राजकीय वाटचाल, विशेषतः 2029 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, या दोघांना देखील भाजप नेतृत्वाकडून स्पष्ट आश्वासन हवे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
याला गद्दारीच म्हणतात.. बंडू जाधवने मतदारांचा अपमान केला; मी पुन्हा परभणी लढणार…
दुसरीकडे, फुटीच्या उंबरठ्यावर असलेच मानले जाणारे काही खासदार आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अजून देखील संवाद सुरू असल्याचा दावा शिंदे गटातील काही नेत्यांनी केला आहे. त्यामुळे ही राजकीय प्रक्रिया थांबली असली तरी पूर्णपणे संपलेली नाही, असे संकेत मिळत आहेत. दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमध्ये उस्मानाबादचे खासदार ओमराजे ओमराजे निंबाळकर यांची भूमिका अत्यंत महत्वाची मानली जात आहे. निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना आपण सध्या पुण्यात असून २० तारखेला येणाऱ्या निंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करू, असे सांगितले आहे. मुलाची प्रकृती ठीक नसल्यामुळे आपण पुण्यातच थांबलो असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे केवळ शिवसेना नव्हे तर राज्यातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
ठाकरेंचा पलटवार; कायदेशीर तयारी सुरू
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने देखील आपली रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. पक्षातील खासदारांनी फुटून स्वतंत्र गट स्थापन केल्यास किंवा पक्षविरोधी भूमिका घेतल्यास कोणती कायदेशीर पावले उचलता येतील, याबाबत पक्षाने तज्ज्ञांकडून सल्ला घेतल्याची माहिती आहे. फुटीर खासदारांना कायदेशीर कचाट्यात अडकवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी देखील सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने उद्या सकाळी ११ वाजता संसदीय दलाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी सर्व खासदारांना अधिकृत व्हीप बजावण्यात आला आहे. बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या खासदारांवर पक्षांतर्गत तसेच कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा स्पष्ट इशारा देखील देण्यात आला आहे.
राजकीय भवितव्याचा निर्णय उद्या?
उद्याच्या बैठकीला किती खासदार उपस्थित राहतात, कोण गैरहजर राहतो आणि त्यानंतर कोणती भूमिका घेतो, यावर ठाकरे गटातील संभाव्य बंडाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. एकीकडे शिंदे गट आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे पक्ष वाचवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावत असल्याचे चित्र आहे.
‘पक्ष सोडेल त्या दिवशी राजकारणात राहणार नाही’ 6 खासदारांच्या फुटीनंतर राजाभाऊ वाझे भावूक…
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ऑपरेशन टायगर यशस्वी होणार की ऐनवेळी फसणार, याचा निर्णय आता पुढील २४ यासांत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही घडामोड केवळ शिवसेनेपुरती मर्यादित राहणार नसून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकांच्या राजकीय समीकरणांवर देखील तिचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दिल्लीपासून मुंबईपर्यंत आणि महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्षाचे लक्ष आता उद्याच्या बैठकीकडे लागले आहे.
