Download App

बीड जिल्ह्यात अपहरण करून मारहाणीची मालिका थांबेना; माजलगाव तालुक्यात धक्कादायक घटना

बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये बैठक घेणार असल्याची माहिती समोर

Beed Crime : बीड जिल्ह्यात पुन्हा अपहरण करून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चहा पाजतो, असे म्हणून अप्पा काशिनाथ राठोड या माजलगाव तालुक्यातील (Beed) जीवनापूर येथील व्यक्तीला दुचाकीवरून दूर नेलं. तेथे पाच ते सहा जणांनी दारू पाजली. नंतर वाहनातून अपहरण करून राठोड यांना सात तास बेदम मारहाण करण्यात आली आहे.

या मारहाणीत राठोड जखमी झाले असून त्यांच्या डोक्यात सात टाके पडले आहेत. अंगावर सर्वत्र वळ उमटले आहेत. हा प्रकार 18 मे रोजी सायंकाळी 6 वाजता घडला. यातील जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

बीडच्या गुन्हेगारीवर सुरेश धसांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, बिंदूनामावलीचाही मुद्दा मांडणार, पोलिसांवरही संशय

या मारहाणीच्या घटनेत गुंडांनी मारहाणीचा व्हिडीओ बनवल्याचीही माहिती समोर आली आहे. तर हाच व्हिडीओ व्हायरलची धमकी दिल्याचं समोर आलंय. 18 मे रोजी सायंकाळी 6 वाजता अपहरण करून पहाटे 3 वाजता सोडलं. यादरम्यान खूप मारहाण करून व्हिडीओ बनवले, असेही राठोड म्हणाले आहेत. दरम्यान, या प्रकरणात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणात फिर्यादी असलेल्या आप्पा राठोड याच्यावरच वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याची ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे का घडलं सध्यतरी समोर आलेलं नाही.

बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार असणार असून, जिल्ह्यातील सर्व आमदारांना बैठकीसाठी बोलावले जाणार आहे. मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मारहाणीचे व्हिडिओ सोशल माध्यमात वायरल होत आहेत. याबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी कोणाचीही गय केली जाणार नाही असंही सांगितल. मात्र, या घटना काही थांबत नाहीयेत.

follow us