Download App

राष्ट्रवादीत ‘शरद पवार’ एकमेव बॉस! अजित पवार, पटेल, तटकरेंसह 8 आमदारांना मोठा धक्का

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार (Sharad Pawar) हेच राष्ट्रीय अध्यक्ष असून पक्षाचा त्यांच्या पूर्ण विश्वास आहे, असा ठराव पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये संमत करण्यात आला आहे. याशिवाय खासदार प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, अजित पवार यांच्यासोबत शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेल्या अन्य 8 आमदारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर दिल्लीतील शरद पवार यांच्या घरी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. यासोबतच विविध आठ ठरावही संमत करण्यात आले आहेत. (A resolution has been passed in the national executive of the party that Sharad Pawar is the national president of the NCP)

राष्ट्रवादीच्या बैठकीतील आठ ठराव :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री.शरद पवार यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त करते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीने माननीय कार्याध्यक्ष श्री प्रफुल्ल पटेल, श्री सुनील तटकरे आणि भाजपशी हातमिळवणी केलेल्या महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या 9 विधानसभा सदस्यांची (आमदार) हकालपट्टी करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.

कार्यसमिती माननीय अध्यक्षांना पक्षाच्या राजकीय नीतिमत्ता, मार्गदर्शक तत्त्वे, धोरणे आणि विचारसरणीच्या विरोधात वागत असलेल्या आणि ज्यांच्या कृती पक्षाच्या हिताला बाधक आहेत त्यांच्याविरुद्ध आवश्यक कारवाई सुरू करण्याचा अधिकार देते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीने मणिपूरमध्ये सुरू असलेल्या सांप्रदायिक परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मणिपूरच्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

भाजप सरकारच्या लोकशाहीविरोधी आणि असंवैधानिक कृती आणि विरोधी पक्षांविरुद्ध सरकारी यंत्रणांच्या गैरवापराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा आहे.

महागाई, बेरोजगारी आणि महिलांची दुर्दशा या सरकारच्या धोरणांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निषेध करतो.

आम्ही विरोधी पक्षाच्या एकजूटीसाठी ठामपणे उभे आहोत.

कार्यकारिणी याद्वारे श्री प्रफुल्ल पटेल, श्री सुनील तटकरे, श्री एस. आर. कोहली यांची खालील पदांवरुन हकालपट्टी करण्याच्या अध्यक्षांच्या निर्णयांना मान्यता देते.
1. केंद्रीय शिस्तपालन समिती आणि इतर कोणत्याही राज्य किंवा राष्ट्रीय समित्या.
2. पक्षाच्या घटनेनुसार यापूर्वी स्थापन केलेल्या कोणत्याही समित्या.
3. पक्षाच्या घटनेनुसार स्थापन केलेले कोणतेही ट्रस्ट.
4. पक्ष किंवा अध्यक्षांनी दिलेले अधिकार आणि कार्ये असलेली कोणतीही जबाबदारी.

शरद पवारांच्या बैठकीवर अजित पवारांचा आक्षेप :

दरम्यान, शरद पवार यांच्यावतीने बोलविण्यात आलेल्या या बैठकीवर अजित पवार यांच्यावतीने आक्षेप घेण्यात आला आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 30 जूनच्या बैठकीत निवड बहुमताने त्यांची निवड झाली आहे. आता हे प्रकरण निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. त्यामुळे शरद पवार यांना अशी बैठक बोलवण्याचा किंवा घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असा दावा अजितदादांच्या गटाकडून करण्यात आला आहे. याबाबत निवडणूक आयोगाला पत्रही लिहिण्यात आलं आहे.

Tags

follow us