BMC Mayor : महापौर मराठी अन् वोटबँक गुजराती; भाजपने एक दगडात मारले दोन पक्षी
गुजराती-जैन मतदारांच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या मराठी उमेदवाराला महापौरपदी बसवून भाजपने एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे.
BJP kills two birds with one stone in Mumbai Municipal Corporation : मुंबई महानगरपालिकेची सत्ता पहिल्यांदाच हातात घेणाऱ्या भाजपने आज महापौरपदासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली. मुंबई महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 132 मधून विजयी झालेल्या भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांची महापौरपदासाठी निवड करण्यात आली आहे. भाजप-शिवसेना युतीकडे महानगरपालिकेत 114 हा बहुमताचा आकडा असल्याने रितू तावडे यांची महापौरपदावरील निवड ही केवळ औपचारिकता मनाली जात आहे.
यंदा मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाल्यानंतर या पदासाठी कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या शर्यतीत तेजस्वी घोसाळकर, शीतल गंभीर आणि रितू तावडे यांची नावे चर्चेत होती. मात्र अखेरच्या टप्प्यात रितू तावडे यांनी बाजी मारली. रितू तावडे यांची निवड अनेक अर्थांनी महत्वाची मनाली जात आहे. त्या प्रथम 2017 मध्ये घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक 121 मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.
यंदाच्या निवडणुकीत त्यांनी वार्ड क्रमांक 132 मधून विजय मिळवला. त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देखील यशस्वीपणे सांभाळली आहे. तसेच त्या भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आणि ईशान्य मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदावर देखील कार्यरत होत्या. 18 एप्रिल 1973 रोजी जन्मलेल्या रितू तावडे यांचे शिक्षण एस. वाय. बी. कॉमपर्यंत झाले आहे. त्यांचे पती राजेश तावडे हे उद्योजक आहेत. त्यांनी ज्या वार्ड क्रमांक 132 मधून विजय मिळवला आहे, तो परिसर गुजराती बहुल म्हणून ओळखला जातो.
पैसे वाटून मतदान करून घ्या; माजी मंत्री तानाजी सावंत यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
या वार्डमधून विद्याविहार पूर्वेचा काही भाग, गारोडिया नगर, सोमय्या कॉलेज आणि राजावाडी रुग्णालयाचा परिसराचा समाविष्ट आहे. येथे मोठ्या प्रमाणावर गुजराती आणि जैन समाजाची वस्ती असून हा भाग भाजपचा बालेकिल्ला मनाला जातो. रितू तावडे या मराठा समाजातील असल्या तरी भाजपने त्यांना गुजरातीबहुल बालेकिल्ल्यातून निवडून आणत थेट महापौरपदासाठी संधी दिली आहे. भाजपने त्यांच्या माध्यमातून महापौरपदासाठी मराठी चेहरा दिला असला, तरी अप्रत्यक्षपणे गुजराती-जैन मतदारांनाही आश्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
गुजराती-जैन मतदारांच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या मराठी उमेदवाराला महापौरपदी बसवून भाजपने एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाने मराठी महापौर या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली होती. भाजपने सुरूवातीला महापौर हिंदू असेल अशी भूमिका मांडली होती. मात्र यामुळे मराठी मतदार नाराज होण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर भाजपने कोणताही वाद टाळण्यासाठी रितू तावडे यांच्या रूपाने मुंबईच्या महापौरपदी मराठी चेहरा पुढे केला आहे.
