Beed Crime : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील लवूळ गावात सेवानिवृत्त पोलीस (Beed) अधिकाऱ्याला अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. किरकोळ बाराशे रुपयांच्या वादातून ऊसतोड मुकादम आणि त्याच्या साथीदारांनी एका शेतमजुराचे अपहरण केलं आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी गेलेल्या राजाराम सिरसट या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला जबर मारहाण करण्यात आली.
ऊसतोड कामगाराचं बाराशे रुपयांसाठी मुकादमाने अपहरण केल्याची माहिती मिळताच सालगड्याला वाचवण्यासाठी गेलेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसट यांना ऊसतोड मुकादम आणि त्याच्या साथीदारानी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेमध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसट हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माजलगाव तालुक्यातील किट्टीआडगाव येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसट यांचा शेतगडी विश्वनाथ पंडितचे ऊसतोड मुकादम शेख राजू शेख बाबू रा. मंजरथ ता. माजलगाव जि.बीड याचे बाराशे रुपये देणे होते. या बाराशे रुपयांसाठी या मुकादमाने व त्याच्या साथीदारांनी शेतगड्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी शेत मालक राजाराम सिरसट यांना फोन करून मारहाण होत असल्याची माहिती दिली.
बीडच्या गुन्हेगारीचा रोज एक अंक; जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची मारहाण, तरुण रक्तबंबाळ
याची माहिती मिळताच सेवानिवृत्त राजाराम सिरसट यांनी संबंधित मुकादमाकडे फोनवरून विचारणा केली. तेव्हा त्यांनी दीड लाख रुपये द्या आणि शेतगड्याला घेऊन जा असे सांगितले. त्यामुळे राजाराम सिरसट यांनी दीड लाख रुपये दिल्यास तुम्ही माझ्या शेतगड्याला सोडणार का? असे विचारताच त्यांनी पैसे घेऊन या त्याला सोडतो असे सांगितले. त्यानंतर राजाराम सिरसट यांनी घरी जाऊन दीड लाख रुपये घेतले व मुकादमाने सांगितलेल्या ठिकाणी गेले.
यावेळी मुकादम शेख राजू शेख बाबू आणि त्याच्या साथीदारानी शेत गड्यासह राजाराम सिरसट यांन मारहाण केली. या मारहाणीत राजाराम सिरसट गंभीर जखमी झाले. या गंभीर जखमी अवस्थेत राजाराम सिरसट यांना जबरदस्ती मोटरसायकलवर बसवून माजलगाव तालुक्यातील ढोरगाव आणि लवूळ शिवारातील घनदाट असलेल्या जंगलात घेऊन जाऊन पुन्हा मारहाण करायला सुरुवात केली.
लाठ्या-काठ्या, धारदार शस्त्रं, अगदी रिव्हॉल्वरचा धाक दाखवत जंगलात नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. इतकंच नव्हे तर दीड लाख रुपये लुटून त्यांच्या तोंडावर लघुशंका करून अमानुष वर्तनही करण्यात आलं. याची माहिती मिळताच सिरसट यांचा मुलगा त्याठिकाणी आला, मुलगा पोहोचताच आरोपी पळाले. मात्र, एक आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलं. गंभीर जखमी अवस्थेत राजाराम सिरसट यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.