Fraud Using IPS Nangre Patil face : वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. नांगरे पाटील यांचा एआय चेहरा वापरुन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Patil) ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’द्वारे खोटा चेहरा बनवून नांगरे पाटील बोलत असल्याचं भासवत छत्रपती संभाजीनगर येथील एका वृद्ध दाम्पत्याला गंडा घालण्यात आला. धक्कादायक म्हणजे पीडित दाम्पत्यापैकी पती हा सेवानिवृत्त सरकारी अधिकारी आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयातून सेवानिवृत्त झालेला छत्रपती संभाजीनगर येथील एक वरिष्ठ अधिकारी आणि त्याच्या पत्नीला व्हिडिओ कॉलवरुन फसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा एआय चेहरा वापरुन वृद्ध दाम्पत्याची फसवणूक करण्यात आली. संबंधित वृद्ध दाम्पत्याला पोलीस अधिकारी बोलत असल्याचं सांगत सायबर गुन्हेगारांनी फोन केला. दहशतवाद्यांच्या खात्यातून तुमच्या बँक खात्यात संशयास्पद 20 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचा बनाव करण्यात आला आहे.
Sanjay Shirsat : त्या बॅगेत पैसे की कपडे?; राऊतांच्या व्हिडिओची खरीखुरी माहिती आली समोर
दोन ते सात जुलै या काळात सातत्याने फोन करुन त्यांना डिजिटल अरेस्टची भीती घालण्यात आली. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोला, असे सांगत नांगरे पाटलांचा एआय चेहरा वापरत सायबर गुन्हेगाराने दाम्पत्याशी बातचित केली. सहा दिवसात सायबर गुन्हेगारांनी दाम्पत्याला 78 लाख 60 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे. डिजिटल अरेस्ट असा कुठलाही प्रकार बेकायदेशीर असून सामान्य नागरिकांनी या प्रकारांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.
दुसरीकडे, एका नामांकित कंपनीच्या कंपनी सेक्रेटरीला व्हॉट्सअॅपवर बनावट नंबरवरून कंपनीच्या डायरेक्टरच्या नावाने मेसेज पाठवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पश्चिम प्रादेशिक विभाग सायबर पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीचा विश्वास संपादन करून कंपनीच्या बँक खात्यातून तब्बल 1 कोटी 93 लाख रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.