Download App

गणेशोत्सवात चोरट्यांवर असणार पोलिसांचं लक्ष; साध्या वेशात फिरणार, गणरायाच्या आगमनाला खड्ड्यांचे विघ्न…

२०२५ च्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी महत्वाचे आदेश देण्यात आले आहेत.

  • Written By: Last Updated:

Ganeshotsav 2025 : गणेशोत्सव हा देशभरात जल्लोषात साजरा होणारा सण आहे. (Ganeshotsav) महाराष्ट्राला या उत्सवाची मोठी परंपरा लाभली आहे. यंदाच्या वर्षी राज्य शासनाने गणेशोत्सव ‘राज्योत्सव‘ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी हा गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.

श्री गणेशोत्सव २०२५ च्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी डॉ. आशिया बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे आणि पोलीस उपअधीक्षक वैभव कलबुर्गी यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. आशिया म्हणाले, गणेशोत्सव साजरा करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी. गणेश मंडळांनी देखावे व सजावट करताना शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवर आधारित देखावे तयार करावेत. याबाबत शासनामार्फत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, सर्व मंडळांनी त्यात सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मिरवणुकीच्या मार्गावरील खड्डे तातडीने दुरुस्त करावेत. महानगरपालिका क्षेत्रातील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी अधिक मनुष्यबळ आणि वाहने उपलब्ध करून द्यावीत. शहरातील रस्त्यांवरून मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. विसर्जनस्थळी प्रकाश व्यवस्था, लाईफगार्ड्स आणि पार्किंगची सोय करावी. शहरातील पथदिवे नियमित सुरू राहतील याची दक्षता घ्यावी. नागरिकांना ध्वनीप्रदूषणाचा त्रास होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ठरवून दिलेल्या वेळेत आणि डेसिबल मर्यादेतच आवाज ठेवावा. उत्सवादरम्यान वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घेऊन वाहतूक सुरळीत राहील यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

अण्णाही अनेक वर्ष आप दे मध्ये अडकले; आपला फटकारताना मोदींकडून आण्णा हजारेंचाही उल्लेख

गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या अडचणी आणि सूचनांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश देत जिल्हा प्रशासनाकडून गणेश मंडळांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली जाईल, तसेच मंडळांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. पोलीस अधीक्षक घार्गे म्हणाले, गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करताना कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यावी. ४०० समाजकंटकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांना उत्सवादरम्यान हद्दपार करण्याची कार्यवाही केली जाईल. चोऱ्या रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात येतील. सर्व गणेश मंडळांनी सुरक्षिततेसाठी आपल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. गणेश विसर्जनाच्या मिरवणुका वेळेत सुरू व्हाव्यात. गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण शांततेत साजरे व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.मुंडे म्हणाले, शहरातील रस्त्यांची कामे सुरू आहेत. ज्या ठिकाणी कामे तातडीने होऊ शकत नाहीत तिथे दुरुस्ती केली जात आहे. रस्त्यावरील मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल. शहराच्या स्वच्छतेवर भर दिला जात असून ३० घंटागाड्या आणि १० ट्रॅक्टरच्या माध्यमातून कचरा गोळा केला जात आहे. उत्सवकाळात अधिक मनुष्यबळ व वाहने उपलब्ध करून स्वच्छता केली जाईल.

शहरातील पथदिवे सुरू राहतील याची दक्षता घेतली जात आहे. मंडळांना परवानगीसाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात आली आहे. विसर्जनासाठी पारंपरिक ठिकाणांव्यतिरिक्त १७ ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडे तयार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या बैठकीला विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या अडचणी व काही महत्त्वाच्या सूचना मांडल्या.

follow us