Adani Tarali Project : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळी पंप स्टोरेज प्रकल्पावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्जत-भीमाशंकर येथील टोरेंट प्रकल्पाला विरोध होत असतानाच तारळी प्रकल्पालाही पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांना सामोरे जावे लागत आहे. अदानी कंपनीच्या या प्रकल्पाचे काम आवश्यक परवानग्या न घेताच सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर भूमिका घेतली आहे. उत्खनन आणि बांधकामाची सुरू असलेली कामे तात्काळ थांबवण्याचे निर्देश मंडळाने दिले आहेत.
तारळी प्रकल्पाबाबत यापूर्वीच वनविभागाने कारवाई केली होती. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची आवश्यक पूर्वपरवानगी न घेताच प्रकल्पाचे काम सुरू केल्याचा ठपका ठेवत पाटण वनविभागाने November 13 रोजी अदानी प्रकल्पाच्या अधिकृत स्वाक्षरीदाराला नोटीस बजावली होती. यामध्ये प्रकल्पाचे काम तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही प्रकल्पातील कामकाज आणि परवानग्यांचा मुद्दा चर्चेत राहिला असून आता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईमुळे कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मौजे सावरघर येथील गट क्रमांक 33 आणि 34 मध्ये प्रत्यक्ष पाहणी केली होती. या तपासणीत आवश्यक संमती आणि पर्यावरणीय मंजुरी नसतानाही उत्खनन तसेच विकासकामे सुरू असल्याचे आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मंडळाने प्रकल्पातील सध्या सुरू असलेली आणि प्रस्तावित उत्खनन व बांधकामाची कामे थांबवण्याचे निर्देश दिले. मंडळाची पूर्वपरवानगी मिळेपर्यंत कोणतेही काम पुन्हा सुरू करू नये, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
सातारानंतर सांगलीतही भाजपला धक्का; जिल्हा बँकेवर काँग्रेसचा झेंडा, महेंद्र लाड अध्यक्षपदी
दरम्यान, या प्रकल्पामुळे परिसरातील वृक्षसंपदा आणि पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याने पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. रोहन भाटे यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा विषय पुन्हा ऐरणीवर आला. प्रकल्पासाठी आवश्यक पर्यावरणीय नियम आणि परवानग्यांचे पालन झाले आहे का, याची चौकशी करण्याची मागणीही या प्रकरणातून पुढे आली आहे.
या प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला अभिनेते सयाजी शिंदे यांनीही पाठिंबा दिला आहे. November 15 रोजी त्यांनी प्रकल्पविरोधी आंदोलनातील युवक कार्यकर्ते विवेकानंद पाटील यांच्यासोबत प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी प्रकल्पाचे काम अनधिकृत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच या प्रकरणी सयाजी शिंदे आणि विवेकानंद पाटील यांनी पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामुळे तारळी प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला आता अधिक व्यापक स्वरूप मिळण्याची शक्यता आहे.
वनविभागाची नोटीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काम बंदचे निर्देश यामुळे तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, मंडळाच्या पूर्वपरवानगीशिवाय काम पुन्हा सुरू केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे अदानी कंपनी या प्रकरणात पुढे काय भूमिका घेते आणि प्रकल्पाला आवश्यक परवानग्या कधी मिळतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पर्यावरणाचा मुद्दा आणि स्थानिकांचा विरोध यामुळे तारळी प्रकल्पाचा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.
