राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकासाठी ठाकरे (Thackeray) बंधू एकत्र आले असून शिवसेना-मनसेकडून एकत्रितपणे निवडणूक लढवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे बंधूंकडून मुंबईसाठी जाहीरनामा जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये, आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी अनेक योजनांची घोषणा केली आहे.
शिवसेना-मनसेचा जाहीरनामा जाहीर करण्यासाठी अमित ठाकरे आज दादरमधील शिवसेना भवनमध्ये आले होते, येथे दोन्ही बंधूंनी युतीचा जाहीरनामा जाहीर करताना मोठ्या घोषणा केल्या आहेत. 700 स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्यात येणार आहे. तसेच, लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये स्वाभिमान निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले असताना आता त्यांची पुढची पिढीदेखील मैदानात उतरली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी संयुक्तपणे महापालिका उमेदवारांचे मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे दोन्ही पक्षांची युती झाल्यानंतर मनसे युवा नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच शिवसेना भवनात गेले आहेत. त्यामुळे त्यांचे हे एकत्र येणे, चर्चेचा विषय ठरत आहे.
मुंबईकरांचा स्वाभिमान म्हणत घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये स्वाभिमान निधी देणार आहोत. आम्ही यांच्यासारखं निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण योजना सुरु करत नाहीये. आपली सत्ता आल्यावर आपण हे करू, कोळी महिलांसाठी सुद्धा हे आपण करणार आहोत. कोळी महिलांसाठी माँ साहेब किचनमधून 10 रुपयात जेवण दिले जाणार आहे.
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी एकत्रितपणे आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना मुंबई ही मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे, असे म्हटले. तसेच, तन-मन आपल्याकडे आहे, तर धन त्यांच्याकडे आहे, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच, मुंबईकरांना आपण हक्काचे घर देणार असून पुढच्या 5 वर्षात 1 लाख घरे देणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना मार्गदर्शन करताना म्हटले.
मुंबईची जमीन मुंबईकरांसाठी असणार असून मुंबईकरांच्या जमिनी बिल्डर्सच्या घशात घातल्या जात आहेत,” असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले. मुंबईकरांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देणार असून मुंबई महापालिकेमार्फत कर्करोगाचे रुग्णालय सुरु करणार आहेत. तसेच, मुंबईत 5 नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरु करणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन करताना केली.
तुम्ही नगरसेवक झाला म्हणजे मी नगरसेवक झालो, आदित्य तर आमदार आहे, अशी साद अमित ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना घातली. नाशिकमध्ये तपोवनात त्यांचा मंत्री म्हणतो झाड कापावेच लागणार, एवढा माज आहे. आपल्याला हा माज काढायचा आहे, घमंड तोडायचा आहे. आपण, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाळणाघर सुरु करणार आहोत.
सगळ्या लहान मुलांची काळजी यामध्ये घेतली जाईल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शौचालय आपण सुरु करणार आहोत. याशिवाय, मुंबईत आणखी एक कॅन्सर रुग्णालय सुरु करायचं आहे. अरली डिटेक्शन ज्याने होईल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे रुग्णलाय सुरु करायचं आहे. कारण, मला माहितीये सुरुवातीला यामध्ये आहे किती त्रास होतो.
ठाकरे बंधुंनी मांडलेले १६ मुद्दे खालीलप्रमाणे
१. मुंबईकरांची जमीन मुंबईकरांसाठीच – महानगरपालिकेच्या सर्व जमिनी खासगी बिल्डरला न देता मुंबईकरांना सेवा देणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी परवडणारी घरं त्या ठिकाणी बांधू. ५ वर्षांत १ लाख घरं परवडणाऱ्या किंमतीत मुंबईकरांसाठी.
२. परिवहन – तिकीटांचे दर कमी करायचे. १० हजार इलेक्ट्रिक बसेस. ९०० डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस. महिला व विद्यार्थ्यांसाठी विशेष बेस्ट बसेस.
३. सार्वजनिक आरोग्य पाच नवी वैद्यकीय महाविद्यालये. जेनेरिक औषधांवर भर. पालिकेची स्वतःची अॅम्ब्युलन्स सेवा. पालिकेचं कॅन्सर रुग्णालय.
४. शिक्षण – पालिकेच्या शाळांमध्ये ज्युनिअर कॉलेज. पालिकेच्या शाळांचं खासगीकरण होता कामा नये. सर्व शाळांमध्ये ‘बोलतो मराठी’ उपक्रम राबवणार.
५. आत्मसन्मान – घरकाम करणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये स्वाभिमान निधी. कोळी महिलांसाठी नवे परवाने व जुन्यांचे नुतनीकरण. कष्टकऱ्यांसाठी १० रुपयांत नाश्ता आणि दुपारचं जेवण देणारी ‘मासाहेब किचन्स’. उत्कृष्ट पाळणाघरे. दर दोन किलोमीटरवर महिलांसाठी उत्तम स्वच्छतागृहे.
६. प्रत्येकाला सुरक्षित पार्किंग – महापालिकेच्या वाहनतळांमध्ये मोफत पार्किंग. नव्या पुनर्विकसित इमारतींमध्ये प्रत्येक घराला पार्किंग देणं बंधनकारक.
७. स्वयंरोजगार- बाळासाहेब ठाकरे स्वयं-रोजगार अर्थसाह्य योजना. एक लाख तरुणांना प्रत्येकी २५ हजार ते १ लाख सहाय्यता निधी, २५ हजार गिग वर्कर्स व डबेवाल्यांना ई-बाईकसाठी बिनव्याजी कर्ज.
८. करप्रणाली- ७०० चौरस फुटांपर्यंत घरांवर मालमत्ता कर माफ. सोसायट्यांना इको फ्रेंडली सुविधांसाठी एक लाखाचं अनुदान. कचरा संकलनावरचा प्रस्तावित कर रद्द.
९. पादचारी रस्ता- पेव्हरब्लॉक फ्री व दिव्यांगस्नेही फुटपाथ. मुंबईतल्या मोकळ्या जमिनी बिल्डर्सना आंदण देणार नाही.
१०. मोकळा श्वास- प्रदूषण कमी करण्यासाठी कृती आराखड्याची तातडीने अंमलबजावणी. AQI नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न. विकासामुळे पर्यावरणाचं नुकसान होऊ देणार नाही.
११. पायाभूत सुविधा बीपीटीच्या १८०० एकर जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं वित्तीय केंद्र, सागरी पर्यटन केंद्र. वित्तीय केंद्र मुंबईत पुनर्स्थापित करणार. ऑलिम्पिक दर्जाची स्पोर्ट्स सिटी. स्थानिकांचं जिथल्यातिथे पुनर्वसन. खेळाची मैदाने, बागा उपलब्ध करणार. वाहतूक सुलभतेसाठी मुंबईभोवती मास रॅपिड मोबिलिटीबाबत रिंगरोड ग्रीड.
१२. मोफत वीज – घरगुती वापरासाठी १०० युनिटपर्यंत मोफत वीज. बेस्ट विद्युतच्या विस्तारीकरणासाठी विशेष योजना.
१३. प्रत्येकाला पाणी डिसॅलिनेशन प्रकल्प. एसटीपी प्रकल्प वेळेत पूर्ण करणार. नव्या इमारतींमध्ये रेनवॉटर पर्कोलेशन पिट्स व रेनवॉटर होल्डिंग टँक. प्रत्येक मुंबईकरासाठीस्वच्छव पुरेसे पिण्याचे पाणी.
१४. मुंबईकर तरुणांसाठी प्रत्येक वॉर्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अत्याधुनिक व्यायामशाळा, जुन्या व्यायामशाळांची दुरुस्ती. मुंबईतल्या कॉन्सर्ट्स-क्रिकेट सामन्यांसाठी मुंबईकर स्टँड. १ टक्के आसनं तरुण मुंबईकरांसाठी.
१५. चॅटबॉटवर प्रशासकीय सेवा मुंबईचं डिजिटल मॅपिंग, पालिका प्रशासन कारभार अधिक सुलभ करणार.
१६. पाळीव पशूसाठी – पेट पार्क, पेट क्लिनिक, पेट अॅम्ब्युलन्स आणि पेट क्रेमॅटोरियम.
१७. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देशातलं सर्वात मोठं ग्रंथालय
