राज्यात नवीन सरकार आल्यावर सरकारकडून रस्त्यांच्या कामाची घोषणा करण्यात आली होती. गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी मुंबईतील रस्ते आणि पुलाची कामे थांबली आहेत किंवा संथ गतीने चालू आहेत. यामागे सर्व लोकांना एकाच कंपनीकडून खडी घेण्याचे दिलेले आदेश आहेत. तर ही कंपनी कोणाची आहे? ती कंपनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या लोकांची आहे, असं सांगितलं जात आहे. असा थेट आरोप आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “ही सर्वे खाती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहेत. त्यामुळे हे CM म्हणजे करप्ट मॅन आहेत.”
ते पुढे म्हणाले की मुंबईतील कामाची कंत्राटं काढून तीन महिने झाले, पण अजूनही काम सुरू झालेलं नाही. राज्यात विकासाच्या नावावर केवळ घोटाळे सुरू आहे. हा मुंबईकरांचा पैसा कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा डाव आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, “हा मुद्दा फक्त आम्हीच बोलत नाही. तर हा मुद्दा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भावाने देखील विचारला आहे. त्यांनी देखील तसं पत्र लिहलं आहे.” राहुल नार्वेकर यांचे भाऊ देखील मुंबई महापलिकतेत नगरसेवक आहेत. त्यांनी देखील पत्र लिहलं असल्याचं आदित्य ठाकरे यांनी दाखवलं.
नितीन गडकरींना विंनती करणार
नितीन गडकरी हे वेगवान रस्ते बांधण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांना देखील या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली जाणार आहे. याशिवाय केंद्र सरकारकडे देखील याची तक्रार करून त्यांना या प्रकारनात लक्ष घालण्याची विंनती करणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.