Somnath Suryawanshi Case : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत (Case) झालेल्या मृत्यू प्रकरणी अखेर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमनाथच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. त्यावर एका आठवड्यात मृत्यूचे संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यावर राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. 30 जुलै रोजी म्हणजेच दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल देत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याच आदेशान्वये परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घठनेवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि सोमनाथचे कुटुंब काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेत. त्या अनुषंगाने अगोदर या खुनाच्या प्रकरणात कोण पोलीस दोषी आहेत त्याची जबाबदारी निश्चित करून मग नावे या गुन्ह्यात समाविष्ट करावीत असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात स्वत: न्यायालयात युक्तिवाद केला होता.
संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करा; सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाचे निर्देश
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा माहिती देताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं होतं की, महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे आणि उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात गुन्हा दाखल का केला नाही, असा सवाल उपस्थित केला. दुर्दैव हे आहे की, राज्य शासनच आरोपी आहे या केसमध्ये. सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू सरकारच्या ताब्यात असताना झाला आहे.
मागच्या सगळ्या केसेसमध्ये शासनाचा नेहमीचा प्रयत्न हात झटकण्याचा, तो यामध्येही केला. आम्ही कोर्टाला ही बाब लक्षात आणून दिली, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आई विजया सुर्यवंशी यांची जी तक्रार आहे त्याला अनुसरुनच न्यायालयाचा निकाल आहे. या प्रकरणात एसआयटी नेमावी अशी आमची मागणी आहे. त्यावेळी पोलीस ठाण्यात 70 पोलीस होते. त्यापैकी कोणी मारले याचा तपास व्हावा, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी समाधान व्यक्त केलं होतं. पोलिसांनी घरात शिरुन दारं तोडून मारहाण केली. सोमनाथचं इन कॅमेरा शवविच्छेदन झालं होते, ते खरं झालं होतं. त्या शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. प्रकाश आंबेडकर एखाद्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी खंबीरपणे उभे राहून मला न्याय मिळवून दिला. या देशाच्या संविधानासाठी सोमनाथचं रक्त सांडलं आहे, त्याने बलिदान दिलं आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांचं बलिदान वाया जाऊन दिलं नाही, असं विजयाबाई सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे.